शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा (Eknath Shinde) दिल्लीत महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. शरद पवारांची ही कृती ठाकरे गटाच्या पचनी पडली नव्हती. खासदार संजय राऊत यांनी तर थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरच टीका केली होती. त्यांच्या टीकेला शरद पवार गटातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले होते. परंतु, शरद पवार मौन होते. आज मात्र शरद पवार यांनीच या मुद्द्यावर भाष्य केले. संजय राऊतांनी टीका केल्यानंतर शरद पवार आणि संजय राऊत गुरुवारी पुस्तक सोहळ्याच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी शरद पवारांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले.
पवार म्हणाले, गेले दहा-बारा दिवस संजय राऊतांची आणि माझी गाठ नव्हती. साधारणतः आमची रोज गाठ-भेट होते. आज सकाळपासून एकच बातमी पाहतोय की, “हे दोघं भेटणार.” मला काही समजत नाही एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. संजय राऊत यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या समवेत घालवला, ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचारांचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील.
सगे- सोयऱ्यांचा निर्णय कधीपर्यंत लागू होणार?, जरांगे पाटलांनी थेट तारीखच सांगितली
मी सांगणं योग्य नाही पण बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचं एक आगळं वेगळं रहस्य होतं. सगळे गेल्यानंतर त्यांच्याकडे जे जे शब्द होते त्या शब्दांचा प्रयोग करून आमच्यावर ते आपली आस्था दाखवायचे आणि त्याचे उत्तरही आम्ही त्या पद्धतीतूनच द्यायचो. ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी कधीतरी फोन यायचा. मला ते शरदबाबू म्हणत. फोनवर बाळासाहेब म्हणायचे “शरद बाबू मी येऊ भेटायला की तुम्ही येताय?” बोलावून घ्यायचे आणि भेटीत काल काय बोललो, काय लिहिलं याबद्दल यत्किंचितही शल्य मनामध्ये कधी ठेवायचं नाहीत.
अगत्य, आस्था, व्यक्तिगत सलोखा हा कधीही कमी झाला नाही आणि हे महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल. अशी अनेकांची नावे घेता येतील. हे सगळे या संसदीय इतिहासातील घटक आहेत असे शरद पवार यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट दिसते की त्यांनी संजय राऊत यांनी केलेली टीका फार मनावर घेतलेली नाही.