छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते. ते उत्तम प्रशासक होते. पर्यावरण, जलसंवर्धन, जंगलसंवर्धन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्थापनाचे गुरू छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे ते आदर्श राजे होते. आपण त्यांना जाणता आणि श्रीमंतयोगी राजे म्हणतो. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरील सगळी अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी आपण एक टास्कफोर्सची निर्मिती केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजून पाच वर्षांनी अर्थात 2030 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा 400 वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. आपण शिवनेरीवर आल्यावर इथल्या मातीमध्ये आपल्याला स्वराज्याची जी स्फुर्ती, तेज मिळते; ते तेज घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्ही शिवनेरीवर येत असतो.”
“ज्या काळात संपूर्ण भारतात अनेक राजे, राजेवाडे हे मुघलांचे मंडलिकत्त्व स्वीकारून तिथे नतमस्तक होत होते. अशा काळात आई जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून सांगितले, ‘मराठी मुलकात ज्याप्रकारे अनाचार आणि अत्याचार चाललेला आहे, या मुलखाला त्यातून स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी शिबवा तुझी आहे.’ छत्रपती शिवाजी महाराज यांनी हातात तलवार घेतली, अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र केले. मावळ्यांची फौज तयार करून देव, देश आणि धर्मांची लढाई सुरू केली. खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापन करून पहिल्यांदा भारताचा आत्मभिमान जागरूत करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले,” असं फडणवीस यांनी म्हटले.
मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त करत घेतला ‘हा’ निर्णय
“देशातील 140 कोटी लोकांच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते. ते उत्तम प्रशासक होते. पर्यावरण, जलसंवर्धन, जंगलसंवर्धन, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापनाचे गुरू छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे ते आदर्श राजे होते. आपण त्यांना जाणता आणि श्रीमंतयोगी राजे म्हणतो. कारण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वत:साठी काहीच केले नाही. संपूर्ण आयुष्य रयतेच्या कामी लावले. म्हणून आपण श्रीमंतयोगी राजाची आठवण आपण ठेवतो,” असं फडणवीस यांनी सांगितले.
“छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले आमच्यासाठी मंदिरापेक्षा मोठे आहेत. किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे म्हणून आपण सातत्याने काम करत आहोत. स्वराज्याची राजधानी रायगडवर अनेक कामे आपण सुरू केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरील सगळी अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी आपण एक टास्कफोर्सची निर्मिती केली आहे. काहीही झाले तरी अतिक्रमणे राहणार नाहीत,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
“युनेस्कोच्या एका स्पर्धेत जगातील वारसास्थळे नेमण्यात येतात. अशा स्पर्धेत भारताच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले नामंकित केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले स्थापत्य शास्त्र, जलसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचे उत्तम नमुना असून याची मांडणी पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये युनेस्कोच्या महासभेसमोर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे किल्ले जागतिक वारसा होतील,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.