बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या घडामोडींवरून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप तसेच, सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ” भाजपचे आमदार सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले, त्याच वेगाने त्यांनी ब्रेक लावला. एक मोठे डील झाले असल्याशिवाय असे होणारच नाही. आपण कोणासाठी लढत आहोत, याचे भान त्यांनी ठेवायला हवे होते.” मुंडे – धस भेटीवरून त्यांनी निशाणा साधला. “भाजपची ही परंपरा आहे, एखाद डील पदरात पाडून घेतली आणि ते पुन्हा शांत बसतील. हे डील राजकीय आणि आर्थिक दोन्हीही आहे. या लढ्यात जे कोणी उतरले असतील मग ते सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया असतील, त्याच्याशी बोलून मग मी यावर सविस्तर तुमच्यासमोर मांडेन.” (Sanjay Raut Shivsena UBT on Suresh Dhas and BJP)
“देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांचे बॉस आहेत. इतके मोठे प्रकरण सुरू असताना त्यांनी कोणालाही भेटण्यासाठी हवे, हे चुकीचे आहे. ज्या क्षणी त्या आकाचे आका आले, त्या क्षणी त्यांनी बाहेर पडायला हवे होते, यालाच नैतिकता म्हणतात.” असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली. दरम्यान, शिवसेनादेखील बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. “शिवसेना उबाठा गटाचे सर्व नेते बीडमध्ये जाणार आहेत. आता आम्ही एकत्र यामध्ये लक्ष घालू. देशमुख कुटुंबीयांची फसवणूक झाली आहे. उद्धव ठाकरेदेखील त्यांची भेट घेण्यासाठी बीडमध्ये जातील,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
“छत्रपती शिवाजी महाराज हे सरकारी दैवत नाही. देशाचे तसेच महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराजांच्या काळातही लोकशाही होती ज्याला आम्ही शिवशाही म्हणतो. त्या काळात निवडणुका नसल्या, गृहमंत्री नसला किंवा निवडणूक आयोग नसला तरी लोकशाही होती. आम्ही सगळ्यांनीच महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. निवडणुका आल्या की छत्रपतींच्या मार्गाने चालणार हे सांगतो. पण, महाराजांनी राज्य कारभाराची आचार संहिता निर्माण केली. त्या पाऊलावर पाऊल ठेवून कोणतेही राज्य चालले नाही. छत्रपतींच्या राज्यामध्ये हत्या, बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होती. आज बीडमध्ये काय आहे? भ्रष्टाचार करणाऱ्यांना, बँक लूटणाऱ्यांना अभय आहे. जनतेचा पैसा खूलेआम लुटला जातो,” असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.