सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु आहे. त्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी संतोष देशमुख प्रकरणाची तुलना दिशा सालियान प्रकरणाशी केली आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीवर देखील त्यांनी टीका केली. सुप्रिया सुळे आता देशमुख कुटुंबीयांप्रमाणे दिशा सालियान कुटुंबाची भेट घेणार का? सालियान कुटुंबाचे अश्रू पुसायला त्या कधी जाणार? असा सवाल नितेश राणे यांनी केला. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी चोख शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.त्यावेळी त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. संतोष देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ, आई यांच्याशी सुप्रिया सुळेंनी संवाद साधला. यावेळी कुटुंबीयांनी आपली कैफियत सुप्रिया सुळेंसमोर मांडली. वेळ पडल्यास आम्ही अन्नत्याग करू, पण तुम्ही चिंता करू नका, असा धीर त्यांनी देशमुख कुटुंबीयांना दिला.’
यावर मंत्री नितेश राणे यांनी, “देशमुख कुटुंबीयांचे मारेकरी सापडत नाही तसे दिशा सालियानचे मारेकरीसुद्धा सापडत नाही. सुप्रिया सुळे आता सालियान कुटुंबीयांना जाऊन भेटणार का? दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या आई वडिलांचे अश्रू पुसणार का? ताई सिलेक्टेड चिंता करतात.”