भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आता धसांनी धनंजय मुंडेंविरोधात (Dhananjay Munde) पुन्हा एकदा नवी आघाडी उघडली असून, घडलेल्या भ्रष्टाचाराची माहिती मिळावी यासाठी धसांनी थेट राज्याच्या प्रधान कृषी सचिवांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रामुळे धस हे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (BJP MLA Suresh Dhas Letter Againts Dhananjay Munde)
सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राज्याच्या प्रधान कृषी सचिवांना एक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मागील कृषीमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती मागितली आहे. धसांनी पाठवलेल्या पत्रात तेलबियांच्या उत्पादकता वाढीसंदर्भातील निर्णयांच्या माहितीसह 2020 ते 2025 पर्यंतच्या पत्रव्यवहाराची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच कापूस सोयाबीन तेलबियांचे उत्पादकता देण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती देण्याबरोबरच कृषी विभागाच्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वेगवेगळ्या तक्रारी आल्याचे धस यांनी पत्रात म्हटलं आहे.
Suresh Dhas कृषी सचिवांना पाठवलेलं पत्र काय?
प्रति
मा. श्री. विकासचंद रस्तोगी साहेब
प्रधान सचिव कृमी
मंत्रालय मुंबई ४०० ०३२
विषय :- सन 2023 2024 व 2024 2025 मध्ये कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास साठी विशेष कृती योजने मधील दिनांक 12/05/2022 ते आजपर्यंत मां. आयुक्त कृषि, मां. प्रधान सचिव कृपी व मां. मंत्री कृषी यांच्या पातळीवर झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती व घेतलेल्या निर्णयाच्या संपूर्ण नस्तीची प्रमाणित प्रत मिळण्याबाबत.
महोदय, उपरोक्त विषयानुसार महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात आलेल्या कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास साठी विशेष कृती योजनेमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाद्वारे करण्यात आलेल्या खरेदीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याबाबत तक्रारी वेगवेगळ्या स्तरावरून प्राप्त झालेल्या आहेत. तसेच मां. हायकोर्टात देखील याचिका दाखल झालेल्या आहेत. या संदर्भात विशेष कृती योजनेतील कार्यक्रमात भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने, तत्कालीन कृषी मंत्री कार्यालय तसेच आपल्या कार्यालयातील काही अधिकारी तसेच महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातील काही अधिकारी व कृषी आयुक्तालयातील काही अधिकारी व तत्कालीन कृषी मंत्री या सर्वांच्या संगनमताने शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा व भ्रष्टाचाराचा उघड करण्यासाठी व न्यायालयीन प्रक्रियेसाठी मला विधानसभेत याबाबत विचारणा करण्याची आवश्यकता असल्याने मला वर विषयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मां. कृषी मंत्री, कृषी मंत्री कार्यालय, प्रधान सचिव कृषी कार्यालय, आयुक्त कृषी कार्यालय, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कार्यालय यामध्ये सभेसंदर्भात निधी वितरणा संदर्भात, अंमलबजावणी संदर्भात, निरनिराळ्या समित्यांच्या घेण्यात आलेल्या सभांच्या संदर्भात झालेला पत्रव्यवहार, घेतलेले निर्णय, टिपणी सहाय्यक पासून ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत प्रत्येक स्तरावर झालेल्या टिपण्यासह, प्रत्येकाने टिपणीमध्ये मांडलेल्या मतासह संपूर्ण नस्ती मला हवी आहे तरी कृपया मला ती त्वरित उलट टपाली देण्याबाबतची विनंती धस यांनी पत्राद्वारे केली आहे.