पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प यांनी मोदी यांना ‘मि. प्राइम मिनिस्टर, यू आर ग्रेट’ असे स्वतःच्या स्वाक्षरीसह लिहिलेले एक खास पुस्तक भेट देऊन आपल्या मोदीप्रेमाची साक्ष पुन्हा दिली. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील या मुद्द्यांचे भांडवल मोदीभक्त नक्कीच करतील. मोदींचा हा दौरा भारतासाठी कसा फायदेशीर ठरला, मोदी-ट्रम्प मैत्रीमुळे भारताच्या पारड्यात कसे अनेक लाभ पडले याचा ढिंढोरा मोदीभक्त नक्कीच पिटतील. त्यासाठी ते ट्रम्प महाशयांच्या ‘मोदी इज टफ निगोशिएटर’ या वक्तव्याचा हवाला द्यायलाही कमी करणार नाहीत, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
प्रश्न इतकाच आहे की, मोदी यांच्या ‘टफ निगोशिएशन’ वगैरेमुळे देशाला खरोखर किती फायदा झाला? त्या बदल्यात भारताला अमेरिकेच्या तिजोरीत काय काय टाकावे लागणार आहे? पुन्हा मोदी यांचे हे टफ निगोशिएशन नेमके कोणासाठी होते? देशासाठी की उद्योगपती मित्रासाठी? कारण मोदीमित्र अदानी यांना या दौऱ्याआधीच अमेरिकेतील लाचखोरीच्या खटल्याबाबत दिलासा मिळाला होता. तसा निर्णयच ट्रम्प यांनी घेतला. ‘फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट – 1977’ (एफसीपीए)ला ट्रम्प यांनी सोमवारीच स्थगिती दिली. हे सगळे मोदी यांच्या दौऱ्याआधी घडले असे दिसत असले तरी दौऱ्याच्या पूर्वसंध्येला घडले, हा निव्वळ योगायोग कसा म्हणता येईल? असा निशाणाही उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून साधला आहे.
सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्शवभूमीवर एकनाथ शिंदेंनी घेतली आढावा बैठक
ट्रम्प यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यासंदर्भातील प्रश्नाला मोदी यांनी बगल दिली. देशात असताना तुम्ही ज्या प्रश्नावर मौन बाळगतात, त्या प्रश्नाला परदेशात तुम्ही वैयक्तिक, खासगी संबोधून बगल देता, असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मोदी यांनी आलिंगन देताच ट्रम्प यांना म्हणे खूपच गहिवरून आले. ते मोदी यांना म्हणाले की, ‘‘मिस्टर प्राइम मिनिस्टर, वुई मिस यू अ लॉट!’’ त्यावर मोदी यांनी काय उत्तर दिले ते ट्रम्प यांनाच माहीत. परंतु मोदी आणि ट्रम्प हे ‘मित्र’ आहेत आणि मागील चार-पाच वर्षे ट्रम्प सत्तेत नसल्याने ते एकमेकांना मिस करू शकतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.