मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. राज्यातील या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. राज ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत काही दिवसांपूर्वी शंका उपस्थित केली, तेव्हा त्यांनी भाजपावर देखील अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यामुळे ठाकरे-फडणवीस भेट सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. या भेटीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुद्धा भाष्य केले आहे.
राज ठाकरेंनी पार्कात एक कॅफे उघडले आहे आणि त्यासाठी लोक तिथे चहापानासाठी येत असतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सोमवारी (ता. 10 फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले.
देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला
ज्याबाबत प्रसार माध्यमांनी राऊतांना विचारणा केली. या भेटीबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोलले आहे, इतकेच मला माहीत आहे. तिथे लोक सातत्याने चहापानाला येत असतात. तो कॅफे सर्वांसाठी खुला आहे. राजकारणात असे चहापान होणे, ही चांगली गोष्ट आहे. हा कॅफे चांगला असेल तर तिथे लोक जात-येत राहतात. लोकांना तिथे छान नजारा पाहायला मिळतो, बसायला चांगली मिळते, असा टोला राऊतांनी लगावला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या टीकेवर मनसे किंवा भाजपाचे नेते काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोमवारी सकाळी 10 वाजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. ज्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण दोन आठवड्यांपूर्वीच राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांवरून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली होती. तर राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून भाजपावर सुद्धा अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यामुळे भाजपा आणि मनसेमध्ये नवा वाद निर्माण झाला. पण आता अचानक थेट मुख्यमंत्रीच राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याने या दोघांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या घरी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले.