विधानसभा निवडणुकीतील मतदानात घोळ झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष ठाकरेंनी केला होता. महायुतीच्या विजयावर त्यांच्याच लोकांचा विश्वास बसला नव्हता अशी टीकाही त्यांनी केली होती, त्यानतंर मनसे-महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले. मात्र दुसरीकडे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी आज शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर तरी बंद दाराआड चर्चा सुरू होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण त्यावर मनसे किंवा भाजप, यापैकी कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी मौन सोडले नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या भेटीचं गुपित विचारण्यात आलं असता, त्यांनी थेट उत्तर दिलं.
चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं , मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला. आणि मग तिथून मी निघालो. आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या निकालावर रोखठोक वक्तव्य केले होते. त्यांनी या निकालावर थेट संशय व्यक्त केला होता. त्यातच आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे फडणवीस- ठाकरेंची भेट महत्त्वाची असल्याची चर्चा सुरू झाली.
Devendra Fadnavis अमित ठाकरे विधानपरिषदेतून आमदार होणार?
ठाकरे- फडणवीसांच्या भेटीनंतर आणखी एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याबद्दल.. अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. यानंतर आता भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवलं जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता यात किती तथ्य आहे, ते येत्या काळातच समजू शकेल.