बहुचर्चित आणि त्यासोबतच बहुप्रतिक्षित अशा (Delhi Election Result) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी बुधवार, 5 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. त्यानंतर आता मतदानाच्या तीन दिवसांनंतर मतमोजणी करण्यात येत आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी करण्यात येणार आहे. दिल्लीत गेल्या 10 वर्षांपासून आम आदमी पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे यंदा आप तिसऱ्यांदा आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार की भाजपाला आपची सत्ता उलथवून लावण्यात यश मिळणार हे पाहणे महत्त्वाचे मिळणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपला भाजपाने चुरशीची लढत दिल्याने दिल्लीच्या तख्तावर कोणाची सत्ता येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे. यंदाच्या दिल्लीतील निवडणुकीत भाजपा वि. आप अशी थेट लढत पाहायला मिळाली. इंडि आघाडीत आप आणि काँग्रेस एकत्र असले तरी या निवडणुकीत मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांच्याविरोधात लढलेले पाहायला मिळाले. त्यामुळे काँग्रेसने थेट आपच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने व्होट शेअरिंगमुळे याचा आपला फायदा होणार की तोटा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपा आघाडीवर आहे, मात्र आप हॅटट्रिक करणार, असा विश्वास आपच्या नेत्यांसोबतच आपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आहे.
दिल्लीमध्ये आपने 2020 आणि 2015 मध्ये एकहाती सत्ता स्थापन केली होती. 2015 मध्ये आपने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपाला तेव्हा केवळ 3 जागांवर उमेदवार निवडून आणण्यात यश आले होते. त्यानंतर 2020 मध्ये आपने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी त्यांना 5 जागा कमी आल्या होत्या, पण तेव्हा भाजपाला 8 जागांवर विजय मिळवता आला होता. ज्यामुळे तेव्हा भाजपाने पाच अधिक जागांवर विजय मिळवला होता. पण यंदाच्या निवडणुकीचा विचार केला असता आणि एक्झिट पोलनुसार भाजपाला सत्ता मिळविण्यात यश मिळणार आहे. त्यामुळे एक्झिट पोलनुसार भाजपा खरंच सत्ता काबिज करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.