कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार सु्प्रिया सुळे, संजय राऊत देखील उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. शेवटच्या टप्प्यात अतिरिक्त मतदान झालंय. त्यांची नावं, पत्ते द्यावे निवडणूक आयोगाने सांगावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केलीय. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले की, तीच तीच कॅसेट पुन्हा पुन्हा वाजवण्याचं काम सुरू आहे. महाविकास आघाडीने देखील हीच कॅसेट वाजवली. आता तीच कॅसेट सुप्रियाजी, (Supriya Sule) राहुल गांधी वाजवत आहेत.
मला वाटतं राजकारणातील पोरकटपणा दिसतोय, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी (BJP Leader) केलीय. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केलीय. त्याला तपशीलवार उत्तर दिलंय. याला दिशा सापडत नाही, पक्षाची वाताहत होतेय, अवसान गळलंय. त्यामुळे ईव्हीएम मशीन, तेच तेच कॅसेट वाजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांना देखील आता या नौंटकींची सवय झालीय. त्यामुळे ते या गोष्टी आता गांभीर्याने घेत नसल्याचं देखील दरेकरांनी म्हटलंय.
दिल्लीतील पराभव कॉंग्रेसला स्पष्टपणे दिसत आहे. पराभवाची मानसिकता आताच करून त्यांचं विश्लेषण करण्यासाठी ग्राउंड बनविण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही अगोदर जे बोललो होतो, ते खरं झालं असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. दिल्लीत राहुल गांधी अन् संजय राऊत यांना अपयश दिसतंय. त्यामुळं त्यांनी उद्याची विश्लेषणाची पूर्वतयारी सुरू केलीय, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केलीय.
दिल्लीतील जनता भारतीय जनता पार्टीला बहुमत देईल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केलाय. संजय खासदार, राहुल गांधी यांना पराभव दिसतोय. त्यामुळे त्यांनी उद्याची तयारी आजपासून सुरू केलीय. अशी भूमिका देखील भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलीय. सुप्रिया ताईंना राज ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार वाटलाय. यावर त्यांनी बुडत्याला काडीचा आधार, अशा शब्दांत टोला लगावला आहे.