देशातील सर्वात महत्वाची महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला आहे. जो 74 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आता अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे मिशन मुंबई महानगरपालिका सुरु झाले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधलाय.
लोकसभा निवडणूकीत बऱ्यापैकी कामगिरी करणाऱ्या ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत धक्का बसला होता. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ते स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर आता ठाकरे गटाचे मिशन BMC सुरु झाले असल्याचे दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधत त्यांना मार्गदर्शन देखील केले आहे. त्यात ठाकरे म्हणाले की, काहीजण मुंबई लुटायला आले आहेत. पण मुंबई वाचवण्यासाठी शिवसेना तयार आहे. आपला वार्ड आणि संघटना मजबूत करा. तुम्हाला अजून देखील अनेक आमिषं येतील, त्याला बळी पडू नका, भक्कमतेने लढा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना दिल्याची माहिती मिळत आहे.
येत्या 7 तारखेपासून ठाकरे गटाचे शाखा सर्वेक्षण सुरु होणार आहे. मुंबईमधील शिवसेनेच्या प्रत्येक शाखेला एक निरीक्षक नेमला जाणार आहे. या निरीक्षकाचे काम शाखेत जाऊन पदाधिकारी आणि गटप्रमुख यांच्याकडून आढावा घ्यायचे असे असणार आहे. त्या सोबतच निरीक्षकाकडे शाखा बांधणीचा आढावा घ्यायचे देखील काम असणार आहे. शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालीय की नाही? कोणती आणि किती पदे रिक्त आहेत? याचा अहवाल शिवसेना भवन येथे सादर करण्याची जबाबदारी या निरिक्षकांकडे आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गट आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांवर मोठ्या प्रमाणात भर देणार आहे. त्यामुळे आता आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.