दिवस 19 ऑगस्ट 1666 चा. ठिकाण मुघल बादशाह औरंगजेबच्या आग्रा शहराबाहेर असलेलं जयपूर निवास. बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला गेला. आपण फार आजारी असून अंथरुणात पडून आहोत. आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असं त्यांनी कळवलं. दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे, मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जंद त्यांच्या जागेवर झोपले आणि सगळं शरीर पांघरुणानं झाकून घेतलं. फक्त एक हात बाहेर ठेवला होता. त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं. शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यात बसले. पहारेकऱ्यांना त्या पेटाऱ्यांची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही. हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले. तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आलं. शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून सहा मैल दूर एका गावात पोहोचले. तिथं त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजी रावजी त्यांची वाट पाहात होते. आणि अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्याहून निसटले.
हे वर्णन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचं नि हे लिहिल जदुनाथ सरकार यांच्या शिवाजी अँड हिज टाईम्स या पुस्तकात. जदुनाथ सरकार हे महाराष्ट्राचे मोठे इतिहासकार आहेत. तरीही काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे ठरवले आहे. त्यात राहुल सोलापुरकरांसारखा नटही सहभागी आहे. राहुल सोलापुरकर यांच्या त्या वादग्रस्त विधानावर सध्या जे वादळ उठलय त्याबाबत आपण पुढच्या काही मिनिटांतच समजुन घेऊयात.
पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवली याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. राहुल सोलापूरकर यांनी ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं वक्तव्य केलं. त्यांच्या या विवादित वक्तव्यावर आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अमोल मिटकरी आणि अभिनेता किरण माने यांनी टीका केली आहे.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये सोलापूरकर म्हणतात की शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आर्ग्यातून बाहेर पडले. त्याची खुण व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो.
त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये असे लिहिले की हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आर्ग्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे. हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकरचा समाचार घेतला.
आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट करत राहुल सोलापूरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले की राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु हैवान असल्याच सिद्ध केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान, आपल्या विकृत मानसिकतेतुन इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणुन कधीच खपवून घेतल्या जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आग्य्रातून स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेन.
राहुल सोलापूरकर यांच्या टिप्पणीनंतर मराठी कलाविश्वातूनही त्यांच्यावर टीका होत आहे. असल्या आभाळहेपल्या भिकारचोटांनी आपली मराठी इंडस्ट्री खच्चून भरलेली आहे. असल्या टुकारांना शाहू महाराजांच्या भुमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतलं शेण तसंच आहे, अशा शब्दात अभिनेते किरण माने यांनी सोलापूरकर यांना खडे बोल सुनावले आहेत.
गेल्या काही वर्षात बहुजन महापुरुषांना बदनाम करणारी किंवा त्यांचं इतिहासातील महत्व कमी करणारी वक्तव्ये ब्राह्मणवाद्यांकडून आणि विशेषकरुन संघ व भाजपशी संबंधित लोकांकडून होताना पहायला मिळत आहेत. राहुल सोलापुरकरसारखे अभिनेतेदेखील संघाशीच संबंधित असल्याचं दिसून आलं आहे. यातून त्यांची विकृत मानसिकताच दिसून येत आहे. अशी बदनामीकारक वक्तव्ये करणाऱ्यांवर संघाने किंवा भाजपने काही कारवाई केल्याचे दिसले नाही. त्यामुळे काय संघ या विकृत मानसिकतेच्या लोकांना पाठीशी घालतोय का? किंवा संघाच्याच सांगण्यावरुन हे असे विचार समाजात पसरवले जात आहेत का? असे प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. आता छत्रपती शाहूजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानेही छ.शिवाजी महाराजांचं महत्व कमी करणारं वक्तव्य केल्याने जनमाणसांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.