ओतूर,प्रतिनिधी:दि.३ फेब्रुवारी ( रमेश तांबे )
कांद्याची पात खाल्ल्याने विषबाधा होऊन,चोवीस मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ओतूर फापाळेशिवार
( ता.जुन्नर ) येथे शनिवार दि.१ रोजी घडली.
याबाबत जुन्नर तालुका पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. सुनील भंडलकर अधिक माहिती देताना म्हणाले की, भाऊसाहेब भांड,दीपक शेंडगे,विष्णु भांड,रामदास मंचरे,अनिल राहिंज सर्व रा.धोत्रे ता. पारनेर,जि.अहमदनगर या चार मेंढपाळांनी मेंढ्यांना चाऱ्यासाठी, जुन्नर तालुक्यातील ओतूर फापाळेशिवार येथील शेतकरी रामदास फापाळे यांच्या शेतात वाडा बसविला होता.शुक्रवारी दि.३१ जानेवारी रोजी मेंढपाळांनी दिवसभर मेंढ्यांना नजीकच्या ओढ्याजवळ व इतर ठिकाणी चाऱ्यासाठी नेले होते. त्या ठिकाणी मेंढ्यांनी हिरवा चारा गवत तसेच कांद्याची पात खाल्ली. त्यानंतर रात्री नेहमीप्रमाणे मेंढ्यांचा मुक्काम वाड्यावर होता.दरम्यान शनिवार दि.१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास मेंढ्यांच्या तोंडातून फेस निघून,मेंढ्या तडफडायला लागल्या आणि हळूहळू मेंढ्या मृत्युमुखी पडल्या तसेच काही इतर मेंढ्या तडफडत होत्या.
याबाबत मेंढपाळांनी ओतूरचे सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ. काशिनाथ लाड यांना याबाबतची माहिती दिली.डॉ.लाड यांच्यासह जुन्नर तालुका पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. सुनील भंडलकर,उंब्रजचे पशुधन विकास अधिकारी डॉ.दीपक बेल्हेकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता त्या ठिकाणी भाऊसाहेब एकनाथ भांड यांच्या १४ मेंढ्या,दीपक नाना शेंडगे यांच्या ४ मेंढ्या ,विष्णु राजु भांड यांच्या ३ मेंढ्या,रामदास एकनाथ मंचरे यांच्या २ मेंढ्या,अनिल गोविंद राहिंज यांची १ मेंढी अशा एकुण २४ मेंढ्या पोट फुगून व तोंडातून फेस येऊन, मृत्यूमुखी पडल्या होत्या.आणि त्या व्यतिरिक्त १७ मेंढ्यांवर उपचार करून त्या बऱ्या झाल्याचे डॉ. लाड यांनी सांगितले.पशुधन अधिकाऱ्यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असता,मेंढ्यांनी कांद्याची पात जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्यांचा फुगून मृत्यू झाला असल्याचे सांगितले.मेंढ्या चारताना योग्य ती काळजी घ्यावी.असे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ.भंडलकर यांनी मेंढपाळांना सांगितले.