मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटत आहेत. या प्रकरणात काही आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. आता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप होत आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या घडामोडी घडत असतानाच काल अजित पवार यांचा पालकमंत्री म्हणून पहिलाच बीड दौरा होता. या दौऱ्यात त्यांना स्वपक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्याचबरोबर ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणार नाही अशी भूमिका घेत त्यांना एकप्रकारे अभयच दिले.
यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. धनंजय मुंडे नशीबवान माणूस आहे. इतके सगळे आरोप होऊनही त्यांच्यासाठी अजितदादा छातीचा कोट करून उभे राहिले असे आ. आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट काय ?
पण हा माणूस नशीबवान आहे सगळे होऊन सुधा दादा छाती चा कोट करून उभे आहेत ..मी किती कमनशिबी आहे .. २०१९ मंत्री झालो पालकमंत्रिपदासाठी चढाओढ सुरू झाली. मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते. पण, एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे तीन आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत. पालघर घ्या रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत.
सत्य देवाला माहीत पण मी काही पालकमंत्री होऊ शकलो नाही. मग मी साहेबांमुळे सोलापूरचा पालकमंत्री झालो आणि मला कोरोनाची लागण झाली. काही तासात मला काढून भरणे मामांना जबाबदारी मिळाली. दादा थोडे दिवस थांबले असते तर… अशा खूप जखमा आहेत. पण कधीच हिशोब दिला नाही की मी हे केले मी ते केले.. २००४ ते २o१४ जेव्हा कोणी उभे राहीला तयार नव्हते तेव्हा सगळ्या अवघड प्रसंगात विरोधकांशी उघडपणाने दोन हात करायची आणि दाखले देत आरोप पलटवून लवायचो. पण कधी व्यासपीठावरून त्याचे दाखले देऊन मीच करतो मीच करतो असे केले नाही…कदाचित दादांना हे वागणे आवडत असावे.
Jitendra Awhad अजितदादांच्या मुंडे अन् कार्यकर्त्यांना कानपिचक्या
बीड जिल्ह्यात येताच अजित पवार यांनी वेडेवाकडे प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांना दिला होता. कुणी कुणाला खंडणी मागितली तर मकोका लावायलाही मागेपुढे पाहणार नाही असे त्यांनी सांगितले होते. इतकेच नाही तर मंत्री धनंजय मुंडेंनाही कानपिचक्या दिल्या होत्या. उगीचच मी नुसता आलो की मला मोठा हार द्यायचा, बुके द्यायच. पांडुरंगाची मूर्ती द्यायची. पण त्यांनी काय सांगितलंय ते पण बघा ना. साधुसंतांचे विचार आहेत. इतर गोष्टी आहेत. आता अपेक्षा करत असाल आता दादा आलाय तर काही काळजी नाही. ते डोक्यातून काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका.