जीबी सिंड्रोमचा आणखी एक रुग्ण कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये दाखल, रुग्णांची संख्या झाली तीन
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे दोन रुग्ण उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अशात आज आणखी एक बालक रुग्ण दाखल झाला असून, त्याच्यावर रात्री तपासणी व उपचार सुरू होते. मात्र, त्या रुग्णास जीबी सिंड्रोम झाल्याचे अंतिम निदान झाले. त्यामुळे सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्या जीबी सिंड्रोम रुग्णांची संख्या तीन झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशीर मिरंगुडे यांनी दिली. कर्नाटकातील एक ७० वर्षांचे वृध्द व मूळ झारखंडची सध्या हातकंगणले येथे राहणारी एक १२ वर्षीय मुलगी, असे दोन रुग्ण सध्या सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर काल सायंकाळी वसगडे (ता. करवीर) येथील ११ वर्षीय मुलगा सीपीआरमध्ये उपचारासाठी आला. तपासण्या तसेच लक्षणावरून त्याला जीबी सिंड्रोमचे निदान झाले असून, त्याच्यावर सीपीआरच्या बालरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत, त्याची प्रकृती स्थिर आहे.
३,२०० कोटींचा जीएसटी घोटाळा उघड
बंगळूर : बंगळूरच्या जीएसटी गुप्तचर संचालनालय डीजीजीआयने तीन हजार २०० कोटी रुपयांची जीएसटी फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. डीजीजीआयच्या बंगळूर झोनल युनिटने बंगळूर आणि मुंबईमध्ये ३० हून अधिक ठिकाणी शोध घेतला आणि गुंतागुंतीचा घोटाळा उघडकीस आणला. या प्रकरणातील आणखी एक आरोपी पसार आहे. डीजीजीआय बंगळूर झोनच्या अतिरिक्त महासंचालक सुचेता श्रीजेश यांनी सांगितले. आरोपींनी कोणताही कायदेशीर व्यवसाय न करता बनावट कंपन्या तयार केल्या आणि उलाढाल वाढवण्यासाठी साखळी लिंकचा व्यवसाय केला. या कंपन्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध झाल्या.
छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्राय एमआयडीसी वरून येणारी वाहतूक ठप्प
छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्राय एमआयडीसी वरून येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अपघात झाल्यामुळे गेल्या अर्धा तासापासून वाहनांच्या रांगास रांगा लागल्या आहेत. शेंद्रा एमआयडीसीतील रस्त्यावर एक अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे शेंद्रा एमआयडीसीतून येणाऱ्या शहरातील लोकांना मोठे अडचण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकाच सर्किट हाऊसवर मुक्कामी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री पुण्यातील सर्किट हाऊस येथे मुक्कामी होते.. पण दोन्ही नेत्यांमध्ये भेट होऊ शकली नाही..छगन भुजबळ एका नियोजित कार्यक्रमाला जात असताना त्यांना तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का विचारलं असता भुजबळ म्हणाले की “मी काल मुक्कामी होतो मुख्यमंत्री साहेब रात्री तीन वाजता आले आहेत मला नियोजित कार्यक्रमासाठी निघायचं आहे वेळ होत आहे त्यामुळे आता तरी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार नाही”एवढं बोलून छगन भुजबळ त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी पुण्यातील सर्किट हाऊस मधून रवाना झाले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल
पुण्यात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना बैठकीसाठी बोलावलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा घेणार आढावा