प्रयागराज येथे जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू असणाऱ्या महाकुंभात (Maha Kumbh 2025) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 5 फेब्रुवारी जाणार होते मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी या दिवसाव्यतिरिक्त (5 फेब्रुवारी) इतर कोणत्याही दिवशी महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणार आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे बुधवारी सकाळी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. बुधवारी सकाळी महाकुंभात स्नान करण्यासाठी लाखो भाविक त्रिवेणी संगम आणि इतर घाटांवर जमले होते. मात्र अचानक चेंगराचेंगरी झाल्याने 30 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Government) दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री 8 वाजेपर्यंत 2.06 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमात स्नान केले आहे. कुंभमेळ्यात आतापर्यंत 29.64 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गुरुवारी, महाकुंभाच्या व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी, चार पीसीएस अधिकाऱ्यांसह एक आयएएस तैनात करण्याचे आदेश दिले आहे. हे अधिकारी 15 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजमध्ये उपस्थित राहतील आणि व्यवस्था आणखी सुधारण्यास मदत करतील. तर बुधवारी प्रयागराजमध्ये विभागीय आयुक्त म्हणून काम केलेले आशिष गोयल आणि एडीएचे कुलगुरू भानू गोस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली.