2.2 C
New York

Raj Thackeray : शरद पवारांना 10, अजित पवारांना 42 अन् मनसेचं मतदानच गायब; राज ठाकरेंना मोठा संशय

Published:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज वरळीतील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पक्षाने जनतेसाठी आतापर्यंत जी कामं केली. आंदोलने केली याची माहिती लोकापर्यंत घेऊन जा. खंबीर राहा असा मंत्र कार्यकर्त्यांना दिला. तसेच त्यांनी निवडणुकीतील मतदान, राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा यावरही संशय व्यक्त केला. हा सगळा संशोधनाचा विषय आहे अशा शब्दांत राज ठाकरे यांनी या सगळ्या प्रक्रियेवरच बोट ठेवले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, आपल्याला मतदान झालंय फक्त ते कुठंतरी गायब झालं. आतापर्यंत काय केलं हे लोकांना सांगा. लोकांनी विचारल्यारवर भांबावून जाऊ नका हे चांगलं लक्षण नाही. हा जाणीवपूर्वक केलेला प्रचार असतो. येथे खमके राहा. अनेक पत्रकार अनेक पक्षांच्या दावणीला बांधले गेले आहेत. ते तुम्हाला भांबावून टाकतात. त्यामुळेच आज तीन महत्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी मी येथे आलोय. राज ठाकरे सारखी भूमिका बदलतात असा आक्षेप घेतला जातो. पण भूमिका बदलणं म्हणजे काय हे तरी माहिती आहे का? जनसंघ पुलोदमध्ये शरद पवारांबरोबर काही काळ सत्तेत होता. शरद पवारही कायम भूमिका बदलत राहिले असे राज ठाकरे म्हणाले.

स्वार्थासाठी येणाऱ्या भाजपला ‘राज’ यांचा थेट संदेश

जे निवडून आलेत सत्तेत बसलेत त्यांचे अनेकांचे मला फोन आले होते. मागील वेळी भाजपला 105 जागा होत्या. त्याआधी 122 होत्या आता 132 मिळाल्या हे समजू शकतो. पण अजित पवारांना 42. चार पाच जागा त्यांना मिळतील असे वाटत असताना 42 मिळाल्या यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? शरद पवारांना फक्त 10 जागा मिळतात. हे सगळं न समजण्या पलीकडचं आहे.

चार महिन्यांच्या आधी लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत सर्वात जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आले. त्याच काँग्रेसचे फक्त 15 आमदार विधानसभेत निवडून आले. शरद पवारांचे फक्त 10 आमदार निवडून आले. लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आला त्यांचे थेट 42 आमदार येतात. चार महिन्यांत लोकांच्या मनात असा काय फरक पडला? काय झालं? कशामुळे झालं? हा सगळा संशोधनाचाच विषय आहे.

त्यामुळे या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलंय फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाही. लोकांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. अशा प्रकारे निवडणुका लढल्या जात असतील तर त्या निवडणुका न लढलेल्याच बऱ्या अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्रागा व्यक्त केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img