मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणाचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसून येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सलाइन लावून उपचार घेण्याचं मान्य केलं. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) थेट शब्दांत आव्हान दिलं. फडणवीस यांना एकच म्हणणं आहे की,आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही ते सांगावं अन्यथा वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पुढे म्हणाले, आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी दोनच शब्दांत काय ते सांगून टाकलं पाहिजे. आम्ही आठ ते नऊ मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करणार किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे. फडणवीस साहेबांना आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करणार आहात की नाही? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.
धक्कादायक अहवाल; राज्यातील तिसरी ते पाचवीच्या 50% विद्यार्थ्यांना वाचताही येईना
आम्हाला पुन्हा उपोषणाला बसावं लागेल याची अपेक्षा नव्हती. परंतु, पुन्हा उपोषण करावं लागलं. आताही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दांत सांगावं. आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय अशी घणाघाती टीका जरांगे पाटील यांनी यावेळी केली.