संतोष देशमुख खून प्रकरण चांगलंच गाजत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्याच सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे. मुंडे यांच्या राजीनामा या विषयामवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केलं आहे. (Supriya Sule ) असे आरोप माझ्यावर झाले असते तर नैतिकता म्हणून सगळ्यात आधी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असता, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
खरं तर, मंगळवारी अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक पार पडली, या बैठकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने किंवा अजित पवारांनी सांगितलं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी आमदारांच्या बैठकीत केल्याची माहिती आहे. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘आमच्या मागण्या मान्य करणार की नाही एकदाचं सांगा अन्यथा..’, जरांगेंचा फडणवीसांना इशारा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांना ऐकीव बातम्यांवर अटक झाली होती. त्यांना वर्षे-वर्षे तुरुंगात राहावं लागलं होतं. संतोष देशमुख प्रकरणात तर अनेक पुरावे आहेत. सत्तेतले लोकही याबाबतचे आरोप करतायत. आम्ही विरोधक आहोत, त्यामुळे आमचा बायस आहे, असं आपण गृहीत धरू, पण सत्तेमधले तिन्ही पक्षाचे लोक याबाबतचा आरोप करत आहेत.
धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, माझ्यामुळे पक्षाची दररोज हेडलाईन होत असेल, तर नैतिकतेनं मी पहिल्याच दिवशी पक्षाकडं माझा राजीनामा दिला असता, मी इथं पक्ष वाढवायला आली आहे. पक्षाला अडचणीत आणायला नाही. माझ्यामुळे पक्षाची रोज हेडलाईन होत असेल तर मी एक पाऊल मागे घेतलं असतं. माझी इन्क्वायरी करा, दूध का दूध और पानी का पानी, होऊ द्या, असं मी केलं असतं.