[ आरोपींकडून दुचाकीसह १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत ]
[ स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाई ]
ओतूर,प्रतिनिधी:दि.२७ जानेवारी ( रमेश तांबे )
वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीणची
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली असून,आरोपींकडून
दुचाकीसह १ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
भिमाजी साहेबराव गाडगे वय ३५ वर्षे, बाबाजी काशिनाथ येवले वय ३६ वर्षे, तुषार भाऊसाहेव शिरोळे वय १८ वर्षे, तिघेही रा.गाडगेमळा, कळस ता. पारनेर, जि. अहिल्यानगर अशी आरोपींची नावे असून,आरोपींकडून सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र, दोन सोन्याच्या नथ असा १ लाख ९० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून,आरोपींनी आणखी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सहकारी बँकेत गहाण ठेवले असल्याचे सांगितले असून ते दागिने कायदेशीर प्रक्रीया करून, जप्त करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगीतले.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर हे अधिक माहिती देताना म्हणाले की,आनंदाबाई दशरथ खिलारी वय ६५ वर्षे रा. शिरोली तर्फे आळे ता.जुन्नर जि.पुणे या दि. २३ जानेवारी रोजी भर दिवसा दुपारी १ वाजण्याच्या सूमारास घराजवळील शेतीत काम करणेसाठी गेल्या होत्या,त्या पुन्हा दुपारी अडीच वाजता माघारी घरी आल्या,तेव्हा त्यांच्या घरालगतच्या पत्रा शेडमधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या व खुंटीला अडकवलेल्या पिशवीतील २ लाख ९६ हजार रूपये किमतीचे सोन्याचे वजनाचे दागिने, पिशवीसह कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले होते. त्याबाबत त्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली होती.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी यांनी पोलीस पथकास सुचना करून, सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस पथकाने तपास सुरू करून, घटनास्थळाकडे येणारे जाणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता,घटनेच्या दरम्यान एक संशयित मोटार सायकल गेल्याचे आढळून आली. त्याच प्रमाणे आसपासच्या लोकांकडे चौकशी केली असता, सदरची संशयित मोटार सायकल ही घटनेच्या वेळी फिर्यादीचे घराचे दिशेने जावून पुन्हा माघारी आली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून संशयित दुचाकी व त्यावरील तिघांचा शोध घेत असताना,सदरची दुचाकी ही इसम नामे भिमाजी साहेबराव गाडगे रा. कळस, गाडगेमळा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर हा वापरत असून त्यानेच त्याचे साथीदारांचे मदतीने सदरचा गुन्हा केला आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने संशयिताचा शोध सुरू केला असता, दि.२५ रोजी सदरचा संशयित इसम हा त्याचेकडील दुचाकीसह बेल्हे गावात असून, त्याचे सोबत त्याचे साथीदार आहेत अशी माहिती मिळाल्याने त्यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल, सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र, दोन सोन्याच्या नथ असा एकुण १ लाख ९० हजार रूपये किमतीचा हस्तगत करण्या आलेला असून, आरोपींनी आणखी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सहकारी बँकेत गहाण ठेवले असल्याचे सांगितले असून ते दागिने कायदेशीर प्रक्रीया करून जप्त करण्यात येणार असल्याचे श्री शिळीमकर यांनी सांगीतले.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे यांनी केली असून आरोपीस मा.न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार एस.एम.कोकणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.