राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाले. मात्र, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावल्यामुळं अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं भुजबळ राष्ट्रवादीला (NCP) सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा सुरू झाली होती. अशातच काल (२४ जानेवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि छगन भुजबळ हे एका कार्यक्रमात एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले. त्यांच्यात चर्चाही झाली. त्यामुळं भुजबळ भाजपमध्ये (BJP) जाणार, या चर्चेने पुन्हा जोर धरला. यावर आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाष्य केलं.
मालेगावमधील कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा नव्हता, तो शासकीय कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात शाह यांनी भुजबळांना आपल्या शेजारची खुर्ची दिली असेल तर त्यात गैर काहीच नाही, असं महाजन म्हणाले.
गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अमित शाह शुक्रवारी (२४) नाशिक दौऱ्यावर होते. मालेगाव येथील एका कार्यक्रमात शाह आणि भुजबळ एकाच मंचावर दिसले. यावेळी शाह यांनी भुजबळांना आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसायला लावले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही संवादही झाला. त्यामुळं भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू झाली. याविषयी महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की, मला वाटतं की तो कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा नव्हता. तो एक शासकीय कार्यक्रम असल्यामुळं त्या कार्यक्रमाचे सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले होते.
दिंडोशीत फर्निचर गोदामाला भीषण आग, अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी
माझ्या माहितीप्रमाणे १४ मंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. भुजबळ साहेब हे एक ज्येष्ठ नेते आहेत. ते अनेक वर्ष मंत्री देखील राहिलेले आहेत. स्वाभाविकच अमित शहांनी त्यांना खुर्ची दिली आणि त्यात गैर असं काहीच नाही. तुम्ही वारंवार भुजबळांबाबत प्रश्न विचारत आहात, मात्र मी एक लहान कार्यकर्ता आहे. त्यावर मी काहीच बोलू शकत नाही. त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील. भुजबळ साहेब आमच्या वरिष्ठांशी बोलतील, असं महाजन म्हणाले.
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयासंदर्भातही महाजन यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, पालकमंत्रिपदाचा प्रश्न कधी सुटतो, हे मला काय माहिती, हे देवालाच माहिती. आपल्याकडे ३३ कोटी देव आहेत, असं महाजन यांनी म्हटलं. फक्त नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. पण हा निर्णय देखील चर्चा करून लवकरच सुटेल, असंही ते म्हणाले.