[ साडे चार लाख रूपये किंमतीच्या २८ बॅटरीसह चारचाकी वाहन हस्तगत ]
[ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ]
ओतूर,प्रतिनिधी:दि.२५ जानेवारी ( रमेश तांबे )
मालवाहतूक करणारी वाहने,रात्रीच्यावेळी पार्क केल्यानंतर त्या वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
केतन रोहीदास विधाटे वय २४ वर्षे रा.धालेवाडी, ता.जुन्नर, जि. पुणे असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीकडून चार लाख ४४ हजार रूपये किंमतीच्या २८ बॅटरीसह चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना श्री शिळीमकर म्हणाले की,
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन व आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत मालवाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी पार्क केल्यानंतर वाहनांच्या बॅटरी चोरी होण्याचे गुन्हे वाढले होते. या घटनांमुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक त्रस्त झाले होते.सदर प्रकरणाचे अनुषंगाने दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आदेश दिले होते.
बॅटरी चोरीचे गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सदर गुन्ह्यांचा आढावा घेवून पोलीस तपास पथक नेमले होते.या पथकाने गुन्ह्याची वेळ व ठिकाण याची माहीती घेऊन सदरचा गुन्हा करणारा व्यक्ती हा एकच असून गुन्ह्याच्या ठिकाणी एक सिल्वर रंगाची अल्टो कार चारचाकी वाहन येत आहे व वॅटरी चोरी करून, त्याच वाहनातून बॅटरी नेली जात आहे अशी माहिती तपासात पुढे आली.सदर माहितीच्या अनुषंगाने पथकाने तपास चालू केला असता, सदर गुन्ह्यातील वाहन हे केतन रोहीदास विधाटे हा वापरत आहे अशी माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्याचा शोध घेत असताना तो दि.१५ जानेवारी रोजी नारायणगाव परिसरातील कोल्हेवाडी रोड येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने, त्या ठिकाणी सापळा लावून आरोपी केतन विधाटेला कारसह ताब्यात घेण्यात आले.त्याच्याकडे गुह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, त्याने एकूण ७ गुन्हे केल्याचे सांगितले व गुन्ह्यातील चोरी केलेल्या २८ बॅटरी त्याचेकडील कारमध्ये मिळून आल्या. गुन्हा करताना वापरलेली चारचाकी अल्टो कार व २८ बॅटरी असा एकूण चार लाख ,४४ हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, राजु मोमीण,अतुल डेरे, मंगेश थिगळे, निलेश सुपेकर यांनी केली आहे.