मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Case) प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या प्रकरणात काही आरोपी गजाआड झाले आहेत. त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मकोका (Valmik Karad) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तोही सध्या कोठडीत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर आरोप होत आहेत. यातच आता कराडला धक्का देणारी बातमी आली आहे. विशेष तपास पथकाने कराडची पूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कराडच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तांची जप्ती आणि जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज एसआयटीने दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
वाल्मिक कराडची नेमकी कुठे आणि किती संपत्ती आहे याची सर्व माहिती एसआयटीने (SIT) गोळा केली आहे. याचं रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता सील केल्या जातील. जर यानुसार कार्यवाही झाली तर कराडसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. यासाठी आता एसआयटीने हालचाली सुरू केल्या आहेत. वाल्मिक कराडच्या नावावर बीड, पुणे आणि अन्य विविध ठिकाणी जमीन, फ्लॅट अशा मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती. त्याची संपत्ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटत होते. आता त्याची हीच संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली एसआयटीने सुरू केल्या आहेत. एसआयटीने बीड येथील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 107 अंतर्गत अर्ज न्यायालयात आधीच सादर करण्यात आला आहे.
मुंबईकरांसाठी सुट्टीचा दिवस झाला ‘मेगाब्लॉक’ दिवस
आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही कराडवर गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्यावर मकोका लावण्यात आला. मागील सुनावणीत एसआयटीने कराडने दोन कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा उल्लेख केला होता. या संपत्तीचा शोध घ्यायचा आहे असे एसआयटीने न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर आता या संपत्तीचा पाळेमुळे खणून काढण्यास एसआयटीने सुरुवात केली आहे. एसआयटीने वाल्मिक कराडच्या नावावर असणाऱ्या राज्यातील संपत्तीवर टाच आणली तर कराडच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात आणखी काय कार्यवाही होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.