26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ( Mumbai Terror Attack) आतापर्यंत फक्त अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. या हल्ल्याशी संबंधित आणखी दोन आरोपी फाशीच्या प्रतीक्षेत आहेत. एक म्हणजे अबू जुंदाल, जो पाकिस्तानच्या छावणीतील दहशतवाद्यांचा हस्तक होता. तर दुसरा तहव्वूर राणा (Tahawwur Rana), ज्याच्यावर कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. अबू जुंदालला भारताने पकडले असून तो मुंबईच्या तुरुंगात आहे. मात्र , तहव्वूर राणा सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकन कोर्टाने त्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिलीय.
26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांच्या गोळीबारानं मुंबई हादरली (Mumbai 26 11 Attack) होती. या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह 166 लोकांचा मृत्यू झाला होता, तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले होते. 26 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 29 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत मुंबईत मृत्यू आणि विध्वंसाचे दृश्य होतं. पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईचे रेल्वे स्टेशन, पंचतारांकित हॉटेल्स, हॉस्पिटल आणि ज्यू सेंटरला लक्ष्य केलं. त्या दहापैकी फक्त एक अजमल कसाब जिवंत पकडला गेला, बाकीचे नऊ चकमकीत मारले गेले.
तहव्वूर राणा पाकिस्तानी लष्करात डॉक्टर होता. तो पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. त्याने पाकिस्तानात शिक्षण घेतले… नंतर व्यावसायिक म्हणून कॅनडाला गेला. तहव्वूर राणा यांचा जन्म 1961 मध्ये पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात झाला झाला. तो पाकिस्तानी लष्करात डॉक्टर अन् कॅप्टन पदावर होता. 1997 मध्ये राणानं सैन्य सोडलं अन् पत्नीसह कॅनडामध्ये स्थायिक झाला. 2001 मध्ये त्यांना कॅनडाचे नागरिकत्व मिळालं होतं. शिकागोमध्ये राणा त्याचा जुना मित्र डेव्हिड हेडलीला भेटला..म्हणजेच दाऊद गिलानीला भेटला. ते दोघं शाळेतील मित्र होते. पाकिस्तानातील हसन अब्दाल कॅडेट स्कूलमध्ये त्याने हेडलीसोबत पाच वर्षे शिक्षण घेतलं होतं. राणा हा तोच व्यक्ती आहे, ज्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे हेडलीला भारतीय पर्यटक व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली होती. 26/11 च्या हल्ल्यासाठी राणाने लष्कर-ए-तैयबाला रसद पुरवल्याचा आरोप आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यापूर्वी राणा आणि हेडली या दोघांनी न्यूयॉर्क ते पाकिस्तान आणि दुबई ते पाकिस्तान असा प्रवास केला होता.
हेडलीने पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षण शिबिरात दहशतवादाचे प्रशिक्षण घेतलं होतं. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या मेजर इक्बालने मुंबईतील हल्ल्याच्या कटात या दोघांचाही समावेश केला. हल्ल्याच्या तयारीसाठी राणा स्वत: पत्नीसह मुंबईत आला… ताजमहाल हॉटेलमध्ये राहिला, नंतर त्यांनी ताजमहल हॉटेललाच लक्ष्य केलं. अमेरिकेच्या एफबीआयने 2009 मध्ये राणाला शिकागो येथून अटक केली होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक ऑपरेटीव्ह म्हणून तो भारतात काम करत होता. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला राणाने हल्ल्याची योजना आखण्यात आणि घडवून आणण्यात मदत केली होती. ज्याचे पुरावे भारताने अमेरिकन कोर्टात सादर केले होते, त्यात राणाचा सहभाग स्पष्ट दिसत होता.
दिंडोशीत फर्निचर गोदामाला भीषण आग, अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी
अजमल कसाबवर भारतात खटला चालवण्यात आला अन् 2012 मध्ये त्याला फाशी देण्यात आली. पण, त्या हल्ल्याच्या एका वर्षानंतर, आणखी दोन नावे समोर आली. ती नावं, पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन डेव्हिड हेडली आणि पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन तहव्वूर राणा यांची होती. या दोघांना अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयने शिकागो येथून अटक केली होती. पण ही अटक एका वेगळ्या प्रकरणात होती. ज्यामध्ये ते डॅनिश वृत्तपत्रावर हल्ला करण्याचा कट रचत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
एफबीआयने केलेल्या कठोर तपासानंतर हेडलीने मुंबई हल्ल्याच्या ठिकाणांचा शोध घेतल्याची कबुली दिली. त्यांनी पाच वेळा भारतात फिरून ज्या ठिकाणी हल्ला होणार होता, त्या ठिकाणांची पाहणी केली. हा कट लष्कर-ए-तैयबाने रचला असल्याचं देखील या दोघांनी सांगितलं. आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी तारदेव परिसरात ‘फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ या इमिग्रेशन कंपनीचे कार्यालय उघडलं होतं. या कंपनीचा मालक तहव्वूर राणा होता आणि तिच्या जगभरात शाखा होत्या.
अमेरिकेत अटक झाल्यानंतर हेडलीने आपला आणि राणाचा संपूर्ण कट भारतीय अधिकाऱ्यांसमोर उघड केला. अमेरिकन कोर्टाने हेडलीला 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, मात्र मुंबई हल्ल्यातून राणा निर्दोष सुटला होता. मात्र, डेन्मार्कविरुद्ध कट रचल्याबद्दल त्याला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. दरम्यान, भारताने मुंबई हल्ल्यातील आणखी एक आरोपी अबू जुंदालला अटक केली. न्यायालयाने हेडलीला माफी दिली आणि सरकारी साक्षीदार बनवले. व्हिडिओ कॉलद्वारे हेडलीने मुंबई न्यायालयात हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली.
हेडलीच्या वक्तव्यानंतर भारताने अमेरिकेकडे राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. अमेरिकेने प्रत्यार्पण कराराअंतर्गत त्याला भारतात पाठवण्याचे मान्य केलं. पण, राणाने या आदेशाला अमेरिकन कोर्टात आव्हान दिले. या प्रकरणात आपल्याला गोवले जात असल्याचा दावा राणाने केला. अमेरिकन कोर्टाने राणाता युक्तिवाद फेटाळला. जानेवारीमध्ये उच्च न्यायालयानेही राणांचं अपील फेटाळून लावले. आता तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. जर राणा भारतीय न्यायालयात दोषी सिद्ध झाला, तर त्याला फाशीची शिक्षा होणार, हे मात्र नक्की.