अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित आयात शुल्क वाढीच्या निर्णयाबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan ) यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. राजन यांनी ट्रम्प यांच्या शुल्क वाढीच्या योजनांना अनिश्चिततेचा एक मोठा स्रोत असं वर्णन केलं आहे. ज्यामुळे जागतिक आर्थिक स्थिरतेला बाधा पोहोचू शकते.
Raghuram Rajan स्थिरता बिघडू शकते
मला वाटते की, डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात शुल्क वाढीचे निर्णय अनिश्चिततेचे मोठे स्रोत आहेत. ज्यामुळे जगाची आर्थिक स्थिरता बिघडू शकते. त्याचबरोबर हा निर्णय अमेरिकेसाठीही फायदेशीर असेल असं वाटत नाही. अनेक वस्तू अमेरिकेच्या बाहेर बनवल्या जातात कारण त्या बाहेर बनवणं स्वस्त आहे, असं रघुराम राजन यांनी दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्ताने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.
अतिरिक्त आयात शुल्क लादून काही वस्तूंच्या उत्पादकांना अमेरिकेत परत आणण्याचा हा प्रयत्न सहसा यशस्वी होणार नाही, असंही राजन यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे त्यांनी, अमेरिकेवर कर वाढीचा परिणाम स्पष्ट करताना, रघुराम राजन यांनी चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांचा उल्लेख केला आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ते व्हिएतनामसारख्या लहान देशांकडून वस्तू कशा आयात करतात हे सांगितलं.
Raghuram Rajan उत्पादन खर्च वाढणार
रघुराम राजन पुढे म्हणाले, अतिरिक्त आयात शुल्काद्वारे ते इतर देशांमधून होणारी आयात थांबवू शकतात, परंतु यामुळं अमेरिकेत उत्पादन करण्यासाठी मोठा खर्च येईल. त्यामुळंच चीन व्हिएतनामसारख्या लहान देशांकडून वस्तू आयात करत आहे. याचबरोबर जर एका रात्रीत आयात शुल्क बदलले तर परदेशी गुंतवणुकीत अनिश्चितता निर्माण होईल.
Raghuram Rajan कॅनडा, मेक्सिकोला दणका
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच घोषणा केली की, अमेरिका १ फेब्रुवारीपासून मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त कर लादणार आहे. ओव्हल ऑफिसमध्ये झालेला हा निर्णय उत्तर अमेरिकन व्यापार धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल असून, यामुळे अमेरिकन ग्राहकांना महागाईचा फटका बसू शकतो असंही ते म्हणाले आहेत.