भारतीय संविधानाच्या मुद्द्यावर (Indian Constitution) सध्या काँग्रेस आणि भाजपात जोरदार वादविवाद सुरू आहे. हा वाद सुरू असतानाच आता कर्नाटक हायकोर्टाचे (Karnataka High Court) न्यायमूर्ती कृष्ण एस. दीक्षित यांचं खळबळजनक वक्तव्य समोर आलं आहे. भारतीय संविधानाच्या मसुदा निर्मितीत ब्राह्मणांचंही महत्वाचं योगदान आहे असं वक्तव्य दिक्षित यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद देशाच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.
अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या स्वर्णजयंति निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ब्राह्मण संमेलनात दिक्षित बोलत होते. दिक्षित पुढे म्हणाले, जर बीएन राव यांनी संविधानाचा मसूदा तयार केला नसता तर हा मसुदा तयार करण्यासाठी 25 वर्षे लागली असती. ड्राफ्ट कमिटीतील सात सदस्यांपैकी तीन सदस्य ब्राह्मण होते. ब्राह्मण हा शब्द जातीऐवजी वर्णाशी जोडला गेला पाहिजे असेही दिक्षित म्हणाले.
Karnataka High Court संविधान निर्मितीत ब्राह्मणांचं योगदान
संमेलनात न्या. व्ही. श्रीशानंद देखील उपस्थित होते. देशाच्या विकासात ब्राह्मण समाज मोठं योगदान देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये म्हटलं होतं की बीएन राव यांनी संविधानाचा मसुदा तयार केला नसता तर तो तयार होण्यास 25 वर्षे लागली असती, असे दिक्षित म्हणाले.
वेदांचे वर्गीकरण करणारे महर्षी वेदव्यास हे मच्छीमाराचे पुत्र होते आणि रामायण लिहीणारे महर्षी वाल्मिकी देखील अनुसूचित जाती किंवा जमातीचे होते. आपण शतकानुशतके प्रभू रामाची पूजा करत आलो आहोत आणि त्यांची मूल्ये संविधानात समाविष्ट केली आहेत असेही दीक्षित यांनी सांगितले.