गेल्या काही दिवसांपासून ‘२३ जानेवारीला मोठा भूकंप होणार’ असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale )यांनी ‘ठाकरे गटाचे काही आमदार आणि कॉंग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी म्हणजेच २३ जानेवारीला राजकीय भूकंप होणार’ असा दावा केला होता तर, केंद्रातही मोठा भूकंप होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. यावर आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘राहुल शेवाळे यांचा दारुण पराभव शिवसेनेने केला. अजून किती फोडाफोडी करणार.’असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
‘जो पर्यंत अमित शाह आहेत, तो पर्यंत तुमचा पक्ष आहे. त्यानंतर तुम्हाला भविष्य आणि भवितव्य नाही. तुमचे लटकते-भटकते आत्मे होणार. अमित शाहांचे आशिर्वाद आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय हवा तसा निकाल देतं. तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे म्हणून निवडणूक जिंकताय. तुमची विचारधारा काय?. हे अमित शाह यांच्या करंगळीवर उभं राहिलेलं पाप आहे’ अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केली आहे.
दरम्यान, येत्या २३ तारखेला शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. अशी माहिती माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली होती. त्यामुळे कोणाचा पक्षप्रवेश होणार आणि काय भूकंप होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.