राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीतील अनेक वाद होताना दिसत आहेत. अशातच रायगडच्या पालकमंत्री पदावरुन तटकरे विरुद्ध गोगावले असा वाद नवा नाहीच. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.’“महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरुन दंगल सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरुन त्या जिल्ह्यात रस्त्यावर उतरुन लोकांनी दंगल करणं. टायर जाळणं, धमक्या देणं, तटकरेंविरोधात घोषणा देणं. नाशिकच्या बाबतीतही तेच घडलं. बीडच्या पालकमंत्री पदाबाबतही तसाच घोळ आहे. महाराष्ट्रात यांना जे बहुमत मिळालय त्याचा हे अनादर करतायत.’
आज खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, ‘मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्रीपदाची घोषणा करुन उदय सामंत यांच्यासोबत परदेशात गेले. एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे.पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री, भाजपच स्वत:च बहुमत आहे, तरीही ते आपल्याच पालकमंत्रीपदाबाबतच्या निर्णयांना स्थगिती देतात, हे आश्चर्य आहे”अशी टीका त्यांनी केली आहे.
तर, “पालकमंत्री पदावरुन जी दंगल सुरु आहे, ती त्या त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी आहे.रायगडचे व्यवहार सगळ्यांना माहीत आहेत, आर्थिक देवाण-घेवाणीतून या सर्व मारामाऱ्या सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पदाच्या निर्णयांना स्थगिती देऊन मी लाचार, हतबल मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिलय. अशी जहरी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.