नवनीत बऱ्हाटे….
उल्हासनगर (Ulhasnagar) : संघर्ष, जिद्द, आणि अपार मेहनतीचे प्रतीक ठरलेल्या आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त म्हणून आपले नाव कोरले आहे. गुरुवारी त्यांच्या नियुक्तीने उल्हासनगर शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कामकाजाला नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी बदली झाल्यानंतर आयुक्त पदाचा तात्पुरता कारभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे होता. त्यानंतर आयुक्त पदासाठी अंबरनाथ नगरपरिषदेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ आणि जमीर लेंगरेकर यांची नावे प्रबल दावेदार होती. मात्र, अखेर गुरुवारी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली. उल्हासनगर महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिला आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगरच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून नोंद झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शहराच्या प्रशासकीय व्यवस्थापनाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
मनीषा आव्हाळे यांच्या समोर उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनासमोरील अनेक आव्हाने आहेत. त्यात शहराच्या स्वच्छतेपासून ते पायाभूत सुविधांच्या उभारणीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. स्मार्ट सिटी योजनेला गती देणे, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, आणि प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे या सगळ्यांत मनीषा आव्हाळे यांचे प्रशासनिक कौशल्य महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती केवळ प्रशासकीय निर्णय नसून, शहराच्या प्रगतीसाठीची मोठी संधी मानली जात आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर शहराचा कायापालट होईल, असे विश्वास व्यक्त होत आहे. मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगर महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून नियुक्ती केवळ इतिहासात नोंदली जाणारी घटना नाही, तर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरचा विकास नवा टप्पा गाठेल, अशी अपेक्षा आहे. उल्हासनगर महापालिकेला नवा चेहरा आणि नव्या उंचीवर नेणाऱ्या मनीषा आव्हाळे यांचे नेतृत्व नागरिकांसाठी आश्वासक ठरणार आहे.
अपात्र लाडक्या बहिणींकडून पैशांची वसूली होणार? मंत्री तटकरेंनी क्लिअरच केलं
आयुक्त मनीषा आव्हाळे : प्रेरणादायी प्रवास
मनीषा आव्हाळे यांचे वडील शिक्षणप्रेमी होते. स्वतः उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न त्यांनी आर्थिक अडचणींमुळे सोडले, मात्र मुलगी कलेक्टर व्हावी, असे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. मनीषा यांचे शिक्षण चौथीनंतर विविध शहरांतील बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी पुण्यातील आयएएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी घेतली. यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी वडिलांनी त्यांना दिल्लीला पाठवले.
833 रॅंक ते 33 रॅंकचा प्रवास
पहिल्याच प्रयत्नात मनीषा यांनी 833 वी रॅंक मिळवली. परंतु, वडिलांनी त्यांना पुन्हा तयारी करण्यास प्रवृत्त केले. 2018 मध्ये त्यांनी 33 वी रॅंक मिळवत देशभरात लौकिक मिळवला. या यशाचे श्रेय त्यांनी वडिलांच्या प्रेरणेला दिले. यूपीएससीच्या तयारी दरम्यान मनीषा यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. वडील गंभीर आजारी पडले, तर आईला कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जात त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केला. मनीषा आव्हाळे यांनी आयुष्यभर संघर्ष करत आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले. कठीण परिस्थितीतून जिद्दीने लढा देत त्यांनी हे यश मिळवले. सोलापूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या शहरी विकासाला गती मिळाली होती, आता त्यांची उल्हासनगर महापालिकेत पहिल्या महिला आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.