इस्त्रायल आणि हमास यांच्यातील (Israel Hamas War) यु्द्ध तब्बल 15 महिन्यांनंतर थांबणार. युद्धविरामाचा करार झाला. घोषणाही झाली. पण हे काही खरं दिसत नाही. कारण युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर काहीच वेळात इस्त्रायलने गाझा पट्टीत तुफान हल्ले केले. या हल्ल्यांत 86 लोकांचा मृत्यू झाला तर 256 लोक जखमी झाले आहेत. गाझा सिव्हील डिफेन्सने ही माहिती दिली आहे.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार गाझाच्या सिव्हील डिफेन्स प्रवक्त्याने सांगितलं की बुधवारी युद्धाविरामाची घोषणा झाली होती. यानंतरही इस्त्रायलने हल्ले केले. या हल्ल्यांत 86 लोकांचा मृत्यू झाला तर 258 लोक जखमी झाले आहेत. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांत 23 मुलांचा समावेश आहे. याआधी इस्त्रायलच्या सुरक्षा दलांनी सांगितले होते की गाझातील जवळपास 50 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, हमासने ज्या लोकांना अपहरण करून बंधक बनवलं आहे त्या लोकांना सोडण्यासंबंधीच्या करारावर सहमती झाली आहे. या काराराला मंजुरी देण्यासाठी शु्क्रवारी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात येईल. या बैठकीनंतर सरकारकडून या कराराला मंजुरी देण्यात येईल असे नेतान्याहू यांनी सांगितले होते.
याआधी गुरुवारी करारावर मंत्रिमंडळात होणारे मतदान टाळण्यात आले होते. या करारानुसार गाझात युद्ध थांबणार होते. तसेच बंधकांची मुक्तताही केली जाणार होती. करार मंजूर करण्याला होत असलेल्या विलंबासाठी नेतान्याहू यांनी हमासबरोबर शेवटच्या क्षणी जो वाद झाला त्यास जबाबदार धरले. नेतान्याहू यांच्या सरकारमधील आघाडीत तणाव वाढू लागल्याने हा करार कार्यान्वित करण्यास अडचणी येत होत्या.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांचा तुरूंगवास
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी करार पूर्ण झाल्याची माहिती एक दिवस आधीच दिली होती. हमासने 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी इस्त्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात तब्बल 1200 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 250 लोकांना बंधक बनवण्यात आले होते. पॅलेस्टाइनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात आतापर्यंत 46 हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर इस्त्रायलने हा हल्ला केला याचा अर्थ एकतर युद्धविराम लागू झाला नाही किंवा या कराराचे पालन झालेले नाही. या संदर्भात पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या हे अजून समोर आलेलं नाही. परंतु, इस्त्रायल आणि हमास यांच्यात अजूनही तणाव आहे हे मात्र नक्की. अशा परिस्थितीत आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.