गेल्या काही वर्षांपासून (Mumbai Local train) मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकल सातत्याने कोलमडत आहे. तर काही वेळा तांत्रिक बिघाडामुळे लोकल ठप्प होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळी ऐन कामाला जाण्याच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
Mumbai Local train आसनगाव स्थानकामधील विद्युत पॅनलमध्ये बिघाड
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकामधील विद्युत पॅनलमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली. यामुळे आसनगाववरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सवरुन आसनगावाकडे जाणाऱ्या लोकल गाड्या काही काळ बंद झाल्या होत्या. यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.
Mumbai Local train तात्काळ तांत्रिक बिघाड दुरुस्त
आसनगाववरुन लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही इंजिन लावून नेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर तात्काळ हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे. सध्या मुंबई लोकल पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.