मुंबई देशाची आर्थिक राजधाानी अन् इथेच मायानगरी. जगभरात नाव कमावलेल्या बॉलिवूड सेलिब्रेटींचं घर मुंबई. याच शहरातील वांद्रे भागात अनेक सेलिब्रिटी (Saif Ali Khan Attacked) मंडळी राहतात. पण काही दिवसांपासून या भागाला नजर लागली आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार.. त्यानंतर राजकारण आणि बॉलिवूडमध्ये ओळखला जाणारा चेहरा बाबा सिद्दीकींची हत्या या दोन ठळक घटना याच भागात घडल्या. या घटनांची चर्चा थांबत नाही तोच तिसरी घटना घडली. अभिनेता सैफ अली खान याच्या घरात अज्ञात हल्लेखोराने सैफवर चाकू हल्ला केला. या घटनांवरून वांद्रे पश्चिम आता व्हीव्हीआप व्यक्तींंसाठी अनसेफ झालं आहे.
अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर एकूण सहा वार झाले. यात मानेवर आणि पाठीच्या मणक्याजवळील जखमा गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
चोख सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असतानाही अज्ञात मारेकरी त्याच्या घरात घुसला आणि त्याने सैफवर सपासप वार केले. याच एका विचाराने अनेकांनी हैराण केलं आहे. या भागात सेलिब्रिटी व्यक्ती राहतात. त्यामुळे येथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात येथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे हा संशोधनाचा विषय ठरेल. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला तर या भागात खासगी सुरक्षा व्यवस्थाही आहेच. अभिनेते आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षेची व्यवस्था केली आहेत. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत.
इतकी चोख व्यवस्था, सुरक्षा कर्मचाऱ्यांचा राबता असतानाही हल्लेखोर या लोकांच्या नाकावर टिच्चून येतात अन् हल्ला करून निघूनही जातात. ही गोष्ट आधी सलमान खानच्या बाबतीत घडली. नंतर बाबा सिद्दीकी आणि आता सैफ अली खानच्या बाबतीतही हाच प्रकार घडला आहे. तीनही घटनांत हल्लेखोरांना सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत आपलं इप्सित साध्य केलं.
मागील वर्षातील एप्रिल महिन्यात सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने घेतली होती. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी घेत त्याच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली. यानंतर त्याच्या घराबाहेर पुन्हा गोळीबार झाला नाही. मात्र, यानंतर सलमानला सातत्याने धमक्या येऊ लागल्या.
यानंतर मागच्याच वर्षात ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट अनेक दिवसांपासून तयार केला जात होता. सिद्दीकी यांना ठार करण्याचा प्लॅन फायनल झाला. त्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या सुमारास बाबा सिद्दीकी आपल्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना वांद्रे पूर्व भागात घडली होती.