उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये (Prayagraj) 13 जानेवारीपासून महाकुंभ (Mahakumbh 2025) 2025 सुरू झालाय. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी शाही स्नान पार पडलंय. संगम नदीच्या काठावर दर 12 वर्षांनी भरणारा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. या मेळ्यात लाखो भाविक आपल्या पापांपासून मुक्ती मिळविण्याच्या आशेने संगमात स्नान करतात.
यावेळी महाकुंभात संत आणि नागा बाबांच्या अनोख्या रूपाने लोकांचे लक्ष वेधून (Prayagraj) घेतले. यातील सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे ‘काँटे वाले बाबा’. त्यांच्या अद्वितीय आध्यात्मिक साधना आणि जीवनशैलीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
महाकुंभ 2025 मधील ‘काँटे वाले बाबा’ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या ‘काँटे वाले बाबा’चं खरं नाव रमेश कुमार मांझी आहे. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, हे बाबा चक्क काट्यांवर झोपतात. त्यांचं संपूर्ण शरीर काट्यांनी झाकलेलं आहे. हे दृश्य पाहण्यासाठी संगम तीरावर भाविकांची गर्दी जमत आहे. ‘काँटे वाले बाबा’ सांगतात, की ते गेल्या 40 ते 50 वर्षांपासून ही कठीण साधना करत (Kante Wale Baba) आहेत.
‘काँटे वाले बाबा’ने सांगितलंय की, मी काट्यावर झोपू शकतो, ही देवाची कृपा आहे. यामुळे माझं कोणतंही नुकसान होत नाही. उलट फायदाच होतोय. त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे दक्षिना म्हणून मिळत आहे. मिळणाऱ्या दक्षिणेतील अर्धी रक्कम ते दान करतात आणि उरलेल्या रकमेतून उदरनिर्वाह करतात, असं देखील त्यांनी सांगितलंय.
कांटे वाले बाबांची साधना ही केवळ त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक नाही, संयम आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक आव्हानावर मात करता येते, असं देखील शिकवण समाजाला देतेय. बाबांचा विश्वास आहे की, त्यांच्या साधनेमुळे त्यांचं मानसिक संतुलन सुधारलं आहेच, शिवाय त्यांचं आरोग्यही चांगले राहिलंय.
महाकुंभ 2025 चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. भाविक महाकुंभाचे त्यांचे अनुभव सांगत आहेत, ज्यामध्ये कांटे वाले बाबांची अनोखी शैली आकर्षणाचे विशेष केंद्र बनली आहे. आता बाबांची ही अनोखी शैली सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. संगमच्या काठावर भाविकांची गर्दी जमत आहे आणि बाबांची साधना सर्वांना मंत्रमुग्ध करत आहे.