हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील आघाडीचा अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून त्याला लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या सुमारास सैफ अली खानच्या घरी चोर घुसला होता. या दरम्यान चोराने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. या घटनेने हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून हल्लेखोराचा शोध सुरू करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर सैफला लागलीच लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज उत्तमानी यांना दिलेल्या माहितीनुसार सैफ यांना या हल्ल्यात सहा जखमा झाल्या आहेत. यातील दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम पाठीच्या कण्याजवळ आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉ. लीना जैन यांच्या देखरेखीत सैफ अली खानवर (Saif Ali Khan) शस्त्रक्रिया सुरू आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर या जखमांमुळे शरीराचे किती नुकसान झाले याचा अंदाज येईल, असे डॉ. निरज उत्तमानी यांनी सांगितले.
सैफची पत्नी अभिनेत्री करिना कपूर आणि मुले सुरक्षित आहेत. या घटनेवर कुटुंबियांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला आहे. घरात घुसलेल्या चोराने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. आता हा हल्ला चोरानेच केला की आणखी कुणी याचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे. मुंबई पोलीस आणि क्राइम ब्रँचच्या पथकाने हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत.