छत्रपती शिवाजी महाराजांनीही नौदलाला शक्ती दिली होती. त्यांच्याच पावन धरतीवर नौदलाला अधिक सशक्त बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहोत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कोरोना काळातही भारताने चांगलं काम केलंय. भारतानं ‘सागर’ हा जगाला मंत्र दिला. वाघशीर या सहाव्या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्याचं भाग्य मिळालं. जगाचा भारतावरील विश्वास वाढलाय. आपण जगाला वन अर्थ, वन फॅमिलीचा मंत्र दिल्याचेही मोदी म्हणाले. ते मुंबईत तीन युद्धनौकांचे उद्घाटन प्रसंगी बोलत आहेत.
Pm Modi काय म्हणाले मोदी?
उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, आजचा दिवस भारताच्या सागरी वारशासाठी, नौदलाच्या गौरवशाली इतिहासासाठी आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी एक मोठा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवीन शक्ती आणि नवीन दृष्टीकोन दिला. आज त्यांच्या पवित्र भूमीवर, आपण २१ व्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत. एकाच वेळी नौदलात विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुडीचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर ही जहाजे भारतीय निर्मित असून, ही करोडो भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजचा भारत जगातील एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयास येत आहे. आज भारताला जागतिक स्तरावर विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जात आहे. भारत विस्तारवादाने नव्हे तर, विकासाच्या भावनेने काम करत असल्याचे सांगत भारताने नेहमीच खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे समर्थन केले आहे असे मोदींनी यावेळी सांगितले.