बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यात चर्चेत आहे. या प्रकरणात मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या या कारवाईच्या विरोधात कराड समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिली आहे.
काही आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षाची जनमानसातील प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. यातच आता पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे. बीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून हा निर्णय म्हणजे त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
वाल्मिक कराडच्या समर्थकांची बैठक; परळीत पडद्यामागील घडामोडींना वेग
निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्याला तालुकाध्यक्ष पदावरून निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर आता पक्षाच्या वरिष्ठांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांनी घेतल्याची चर्चा आहे.
भविष्यात तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची निवड करताना त्यांची चारित्र्य पडताळणी करावी, नंतरच त्यांची नियु्क्ती या पदांवर करण्यात यावी अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर यांना देण्यात आल्या आहेत. नवीन जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांची निवड होईपर्यंत राजेश्वर चव्हाण हेच जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतील असे पक्षाकडून कळवण्यात आले आहे.