भारतीय क्रिकेटर युवराज सिंग(Yuvraj Singh) यांचे वडिल योगराज सिंग हे अनेकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. अशातच आता पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत युवराज सिंग (Yuvraj Singh) यांच्या वडिलांनी प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Amir Khan) याच्या बहुचर्चित चित्रपटाबाबत ‘मूर्खपणा आहे. अत्यंत फालतू चित्रपट आहे आणि मी असे चित्रपट पाहत नाही’ असं विधान त्यांनी केलं आहे.
युवराज सिंग यांच्या वडिलांनी ‘अनफिल्टर बाय समधीश’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली बेधडक मतं मांडली. अभिनेता आमिर खान याच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाला थेट ‘मूर्खपणा’ असं म्हटलंय. त्याचसोबत मुलांना लहानाचं मोठं कसं करावं, याबद्दल त्यांनी त्यांचा दृष्टीकोन सांगितला. “मुलगा तसाच होईल जसं बाप म्हणेल.” यावेळी त्यांना आमिरच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते म्हणाले, “अत्यंत फालतू चित्रपट आहे आणि मी असे चित्रपट पाहत नाही.” योगराज सिंग यांचं हे वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आलं आहे. आमिर खान दिग्दर्शित ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये आठ वर्षीय ईशान अवस्थीची कहाणी दाखवण्यात आली होती. डिस्लेक्सियामुळे त्याला लिहिता-वाचताना अडचण होते. यामध्ये आमिरने कला शिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं.
याच मुलाखतीत त्यांनी महिलांविषयी देखील वादग्रस्त विधान केलं आहे. ‘योगराज सिंग यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला आहे. “महिलांना अधिकार दिले, तर त्या सर्वकाही उद्ध्वस्त करतील. घरचा प्रमुख पुरुष असला पाहिजे. पुरुषच घर चालवू शकतो. जर घरात पुरुष नसेल तर आईकडे घराची जबाबदारी असली पाहिजे. कुठल्याही बाबाकडे महिला भक्तांची संख्या जास्त असते. त्या तिथे काय मागतात? माझा नवरा, माझा मुलगा माझ्या नियंत्रणात राहिला पाहिजे,” असं ते म्हणाले.