सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जाणारा आणि खंडणी प्रकरणात असलेला वाल्मिक कराड यांना आज बीडच्या केज तालुक्यातील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता त्यांच्यावर मोक्का कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.
बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात वादंग सुरु आहेत. अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी सातत्याने होत होती. अशातच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला. मुख्य गुन्हेगार म्हणून चर्चेत असलेला मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्याचबरोबर त्याच्यावर मोक्का अंतर्गतदेखील कारवाई झालेली नाही. त्यालाही या गुन्ह्यात अटक करून त्याच्यावर कठोर कार्यवाही करावी,अशी देखील मागणी त्यावेळी त्यांनी केली होती.
सरपंच हत्या प्रकरणाला ३५ दिवस उलटून गेले तरी देखील वाल्मिक कराडवर कारवाई होत नसल्याने त्याच्या अटकेची मागणी ही सातत्याने होत होती. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे हे सध्या अटकेत आहेत. तर कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत.मात्र अखेर आज मोक्का लागून करण्यात आला आहे.