लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचेचं लक्ष लागले आहे. अशातच ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसून आलं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सूचक विधान केले आहे. आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबई ते नागपूरपर्यंत महापालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा केली यावर आता शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
‘महाराष्ट्र राज्यात इंडिया आघाडीचा संबंध नाही. पण राज्यातील महाविकास आघाडीचे शिबिराबाबत येत्या आठ ते दहा दिवसात काँग्रेस, शिवसेना आणि आमचे नेते सहकारी एकत्र बसून निर्णय घेऊ.इंडिया आघाडीत आम्ही सर्व एकत्र बसलो तेव्हा आमच्याकडे जेव्हा निवडणुका होत्या. त्यात एकत्र येण्याचा विचार होता. राज्यातील आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्रित काम करावं अशी चर्चा कधीही झाली नाही. इंडिया आघाडीत लोकल निवडणुका एकत्र लढण्याची चर्चा झालीच नव्हती. राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चा या आघाडीत होत होत्या. महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वबळाच्या भूमिकेबाबत खुलासा केला आहे का, ते माहिती नाही. परंतु, एक स्वच्छ सांगतो की, आता बारामती आणि इंदापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तिथे आम्ही आघाडीचा विचार केला नाही. करणार नाही. असे असले तरी आता येत्या आठ ते दहा दिवसांत आम्ही एक बैठक घेणार आहोत,’असं शरद पवार (Sharad Pawar)म्हणाले.
तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही तयारी केली आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष बाहेर आहेत, ते परत आले की, संघटनात्मक पातळीवरील महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये एकत्रित काम करावे, अशी चर्चा झाली नसली तरी आता ज्या पद्धतीने वृत्तपत्रांनी नोंद घेतली. त्यानंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इश्यूवर एकत्र येण्यासाठी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. सर्वांना मिळून करू. आमची भावना आहे की एकत्र येऊन निवडणुका लढल्या पाहिजे’ असं वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं आहे.