विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. या निवडणुकीनंतर आता राज्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांबद्दल स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. मुंबई ते नागपूर पर्यंतच्या महापालिका स्वबळावर लढू अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. या घोषणेनंतर १३ तारखेला खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतली. दरम्यान आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता मोठं विधान केलं आहे.
इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही नक्कीच राहील. जर आम्ही इंडिया आघाडीला जिवंत ठेवलं नाही, तर विरोधक शिल्लक राहणार नाहीत. हे विरोधकांना संपवतील. हे हुकूमशाह आहेत. आमच्यासमोर खूप खतरनाक लोक आहेत. इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकांसाठीच बनवली होती. पण आता ती तशीच कायम ठेवणं देशाची गरज आहे. लोकशाहीची गरज आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुका होतात. काँग्रेस आणि आप हे एकत्र लढले होते. त्यांची एकही जागा निवडून आली नाही. जर बसून या गोष्टी चर्चेने संपल्या असत्या तर आम्हालाही आनंद वाटला असता. महाराष्ट्रातही आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या आम्ही स्वबळावर लढू असे सांगितले आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला युती करणं कठीण असते, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
तर, शरद पवार आणि मी भेटलो यात नवीन काय. महाराष्ट्रात एकमेकांना भेटत राहिलं पाहिजे. कटुता ही सत्ताधारी पक्षात आहे. महाविकासाआघाडीत कोणत्याही प्रकराची कटुता नाही. आमच्यात कोणतेही भेदा-भेद नाही. माझ्यात आणि शरद पवारांमध्ये नक्कीच चर्चा झाली. आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यावर लक्ष ठेवा,असं संजय राऊत म्हणाले.