ओतूर,प्रतिनिधी:दि.१३ जानेवारी ( रमेश तांबे )
धोलवड ( भवानीनगर ) येथील एका उसाच्या शेतात जखमी अवस्थेत मिळालेल्या तरसाला वनविभागाने जीवदान दिले असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना श्री ठोकळ म्हणाले की, मौजे धोलवड ता.जुन्नर येथील भवानीनगर शिवारात विलास नलावडे यांच्या उसाच्या शेतात सोमवार दि.१३ रोजी एक तरस जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती विशाल सोनवणे यांचे भ्रमणध्वनीवरून ओतूर वनविभागाला दिली.
सदरची माहिती मिळताच,ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ, वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक विश्वनाथ बेले,वनरक्षक दादाभाऊ साबळे,कैलास भालेराव वन कर्मचारी फुलचंद खंडागळे, किसन केदार,गणपत केदार,गंगाराम जाधव यांनी घटनास्थळी जाऊन,
सदर घटनेची खात्री करून,पाहणी केली असता,सशांच्या शिकारीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी फास यामध्ये सदर तरसाचा पाय अडकल्याने तरस हे गंभीर जखमी होऊन,जखमी स्थितीत उसाच्या शेतात पडलेले होते.आणि त्याचा पाय फासामध्ये अडकल्याने त्याला हालचालही करता येत नव्हती.सदर तरसाला वन कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने तरसाच्या पायात घुसलेला फास बाजूला केला.वनकर्मचारी तसेच रेस्क्यू टीम व ग्रामस्थ यांचे मदतीने स्नेयर,दोर व पिंजऱ्याच्या साहाय्याने जखमी तरसाला रेस्क्यू केले, सदर तरसाचे वय अंदाजे सहा ते सात वर्षे असून,त्याच्यावर पुढिल उपचार करण्यासाठी, माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले