राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी पक्षांतरं केली. हा प्रयोग अनेकांचा यशस्वी ठरला मात्र असेही काही नेते होते पराभवाचा सामना ज्यांना करावा लागला. पराभवानंतर पक्षांतर केलेल्या या नेतेमंडळींत अस्वस्थता वाढू लागली आहे. त्यांनी पुन्हा घरवापसी या अस्वस्थतेतूनच करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, या मंडळींना पुन्हा पक्षात या भाजप घेणार का असा प्रश्न आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तुर्तास विरोधात लढलेल्यांना पक्षात घेऊ नये असं ठरलं आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
बावनकुळे पुढे म्हणाले, 2019 मध्ये उद्धव ठाकरे गटाने ब्लंडर युती केली होती. हे आता त्यांना चांगलंच कळालं आहे. त्यांनी जी युती केली होती. त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे पोहोचत होते. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात होती. शिवसेना कधीच काँग्रेसच्या विचारांवर पुढे जाऊ शकत नाही. आमच्या विरोधात जे उमेदवार निवडणुकीत लढले त्यांना तूर्तास पक्षात घ्यायचं नाही असं आमचं ठरलं आहे. आम्ही तीन नेत्यांचा विचार घेऊन भविष्यात पुढे जाणार आहोत, मंत्री बावनकुळे यांनी असे स्पष्ट केले.
महाराष्ट्रात भाजपाची सदस्य संख्या दीड कोटी असावी आमचा संकल्प आहे. तसेच एक लाख बूथ अध्यक्ष समिती असावी, प्रत्येक तालुक्यात पक्षाचा अध्यक्ष असावा आणि समिती फेब्रुवारीपर्यंत गठीत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राज्यातील 69 जिल्हाध्यक्ष आणि मुंबई असे एकूण 76 जिल्हाध्यक्ष फेब्रुवारीपर्यंत निवडले जातील असे बावनकुळे यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule आजपासून शिर्डीत महाअधिवेशन
भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या आजपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत आहे. नुकत्याच मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनिती या अधिवेशनात ठरविली जाणार असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अनेक राजकीय मुद्द्यांवरही या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
साई संस्थानच्या प्रसादालया शेजारील शताब्दी मैदानावर अधिवेशनासाठी तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. ११ तारखेला भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होऊन नड्डा अधिवेशाचे उद्घाटन १२ तारखेला सकाळी करतील. दुपारी शाह भाजपच्या मंत्री, खासदार, आमदारांसह आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. पुढील वाटचालीच्या रणनीतीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अधिवेशनात शिक्कामोर्तब होईल. अमित शाह शिर्डीनंतर शनिशिंगणापूरलाही जाणार आहेत.