विधानसभेची निवडणुकीत होऊन दीड महिना उलटला तरी देखील महाविकास आघाडी आणि महायुतीत निवडणुकीनंतर टीका टिपण्णी होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाचं खापर मित्र पक्षांवर टाकत असल्याचं दिसत आहे. दरम्यान यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान करत गंभीर आरोप केले आहेत.
आज कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्याच मित्रपक्षांतीली सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. ‘विधानसभा निवडणूकीत जागावाटपाची चर्चा २० दिवस चालली, यात काही षडयंत्र होतं का ? नाना पटोले, संजय राऊत हे चर्चा करत होते.त्या चर्चेत आम्ही ही होतो. जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत संपला असता तर, १८ दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते. जागावाटपात इतका वेळ वाया घालवला, काही प्लानिंग होतं का? बैठक ११ वाजता असायची आणि यायचे दोन वाजता. अनेक नेते उशीरा यायचे. २० दिवस घोळ सुरु होता. त्यामुळे फटका बसला. २० दिवस जागावाटपात वेळ घालवण्यात काही षडयंत्र होतं का? यात वाव आहे’ असं विधान त्यांनी केलं.
दरम्यान, “आम्हाला निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. ही अनेक कारण झाली. त्यामुळे हे एक मुख्य कारण आहे, जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ याचा फटका नक्की बसला” असा ही आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.