डोंबिवली ( शंकर जाधव )
नवी मुंबई महानगर पालिकेत दहा महिन्यांपर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा परिक्षेत्रातील त्या १४ गावांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात भरघोस निधीची व्यवस्था करावी अशी मागणी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश मोरे यांनी नवी मुंबई महापलिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची भेट घेऊन केली. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या विषयीची लवकरात लवकर होईल असा विश्वास दिला.त्यामुळे 14 गावातील नागरिकांना लवकरच सोयी सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी आमदार राजेश मोरे यांचे आभार मानले.
सध्या समाविष्ट झालेल्या त्या १४ गावांची होरपळ होत असून गावे विकास कामांमध्ये वंचित आहेत. गावात पाण्याचा प्रश्न, आरोग्य सुविधा, प्राथमिक शिक्षण रस्ते, स्वच्छता, क्रीडांगणे, घरपट्टी याबाबत प्रशासन ठप्प आहे त्यामुळे समस्या वाढत आहेत. पूर्वी ग्रामपंचायत आणि नंतर महानगर पालिकेची टोलवाटोलवी होत होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या माध्यमातून रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणत केल्याने गावकऱ्यांचा विश्वास बसला. दरम्यान पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. विधानसभा निवडणुकीत आपल्या मूलभूत समस्या सोडविणार असे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले होते. त्यानंतर पाण्यासाठी विधानसभेत आवाज उठविला. पाण्यासाठी निधी मिळविला यामुळे त्या १४ गावातील लोकांचा विश्वास दृढ झाला. आता लागलीच नवी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेवून गावागावात विकासाची गंगा येवू दे असे आयुक्तांना सांगितले. येणाऱ्या अर्थसंकल्पात १४ गावांसाठी राखीव निधीची व्यवस्था करा अशी मागणी केली. आमदार राजेश मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे गावच्या समस्या निकाली लागतील असे आता ग्रामस्थ सांगत आहेत. काम करणारा आमच्या घरातील आमदार मिळाला अशी प्रशंसा लोक करताना दिसून येत आहेत.
कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार राजेश मोरे यांच्या बरोबर उत्तरशीव, नारिवाली, बाळे, वाकळण, बामल्ली, निघु, नेवाळी, नागांव, दहिसर, पिंपरी, दहिसर मोरी, मोकाशी पाडा, भंडार्ली या गावातील पदाधिकारी, लोक नवी मुंबई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते.
चौकट
लाडक्या बहिणींनी आमदार मोरे यांचे मानले आभार
देसाई – शीळ येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आमदार राजेश मोरे आले असता गावातील महिलांनी गावातील पाणी समस्या लवकरात सोडवा अशी विनंती केली. यावर आमदार मोरे यांनी संबंधित पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून यासंदर्भात दोन दिवसात बैठक घेऊन पाणी समस्या दूर करावे असे आदेश दिले. त्यानंतर लाडक्या बहिणींनी आमदार मोरे यांचे आभार मानले.