राज्याच्या राजकारणात कालपासून अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आमच्यासोबत या अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे. खुद्द तटकरे यांनी मात्र आपण कुणाशीच संपर्क केला नसल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीने राज्याचं राजकारण ढवळून निघालेलं असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जर कुणी सोडून जात असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशज असतील असे राऊत म्हणाले आहेत.
राऊत पुढे म्हणाले, अजित पवारांपासून तटकरेंपर्यंत आणि प्रफुल पटेल यांना आज सर्वांना जे काही मिळालं आहे ते शरद पवार यांच्यामुळे मिळालं आहे. आज जी काही किंमत बाजारात त्यांना आहे ते शरद पवार यांच्यामुळे आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे 40 चोर गेलेत त्यांची किंमत जी आहे ती शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहे. तटकरे यांची ही भाषा अमानुष आणि क्रूर आहे. तुम्ही बाप आणि लेकीला सोडा या भाषेपर्यंत येता या का? कारण तुम्हाला केंद्रात मंत्रिपद हवं आहे आणि अमित शहा यांना खूश करायचं आहे. कठीण परिस्थितीत शरद पवारांनी आठ खासदारांना निवडून आणले. जर ते सोडून जात असतील तर ते कंस आणि रावणाचे वंशज आहेत.
Sanjay Raut आरएसएसचं बूथ मॅनेजमेंट घोटाळ्यांचं
शरद पवार यांनी निवडणुकीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचं कौतुक केलं होतं. यावर बोलताना राऊत म्हणाले, आरएसएसच्या लोकांनी बूथ मॅनेजमेंट केलं ते कौतुकास्पद आहे. गैरप्रकार प्रत्येक बुथवर झाले ते आम्ही समोर आणले. बूथ यंत्रणा ताब्यात घेऊन मतं टाकण्यात आली त्याचा हिशोब लागत नाही. हे जर आरएसएसने केलं असेल तर त्याचं कौतुक मी करणार नाही. विजयाची आम्हाला खात्री होती पण गाफील कुणीच नव्हतं. प्रत्येकाने आपली यंत्रणा ताकदीनं राबवली. बारामतीमध्ये युगेंद्र पवार गाफील होते का? नाही ना. सर्वजण कष्ट करत होते पण प्रत्येक बूथवर घोटाळे झाले. आरएसएस बूथ मॅनेजमेंट हे घोटाळ्यांचं मॅनेजमेंट आणि भाजपचं बूथ मॅनेजमेंट हे दबावाचं मॅनेजमेंट होतं अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Sanjay Raut मुंडेंचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, या महाराष्ट्रात सर्व माफियांना अभय आहे. सरकारमधील अनेक मंत्री थेट माफियांशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून दबाव आहे. पण, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंडेंचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. आपली जातीय व्होटबँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.