-2.2 C
New York

Tirupati Temple  : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू

Published:

आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती विष्णू निवासम (Tirupati Temple)  निवासी संकुलात बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले आहेत. वैकुंठ द्वार याठिकाणी दर्शनाचे टोकन मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले होते, याच ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून ती तामिळनाडूची रहिवासी मल्लिका आहे. मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 भाविक जखमी झाले आहेत.

अपघातानंतर लगेचच त्यांनी तिरुपती प्रशासन आणि टीटीडी अधिकाऱ्यांसोबत माहिती गोळा करण्यासाठी आणि आवश्यक आदेश देण्यासाठी टेलिफोन कॉन्फरन्स आयोजित केली. आज दुपारी मुख्यमंत्री स्वतः तिरुपतीला पोहोचतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील. दरम्यान, विरोधी पक्ष वायएसआरसीपीने हा अपघात निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे येत असतात. वैकुंठ द्वार दर्शन यंदा 10 ते 19 जानेवारी दरम्यान होणार आहे. यासाठीच टोकन वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. आजपासून टोकन वाटपाला सुरुवात होणार होती. परंतु, एक दिवस आधीच लोकांची गर्दी झाली होती. याच दरम्यान लोकांनी बैरागी पट्टीडा पार्क आणि एमजीएम स्कूल सेंटर येथे रांगा लावल्या होत्या. येथे चार हजार लोकांची काही वेळातच गर्दी झाली होती. याच दरम्यान येथे चेंगराचेंगरी झाली.

Tirupati Temple  तिरुपती देवस्थानने मागितली माफी

या घटनेवर प्रतिक्रिया देताना टीटीडीचे चेअरमन बीआर नायडू म्हणाले, प्रशासनाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली हे आम्ही मान्य करतो. डीएसपीने एका भागात गेट उघडले आणि लोकांनी पळापळ सुरू केली. यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांतील एकाची ओळख पटली आहे. बाकीच्या पाच जणांची ओळख अजून पटलेली नाही. यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (टीटीडी) बोर्ड मेंबर भानू प्रकाश रेड्डी यांनी भाविकांची माफी मागितली आहे.

या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. पोलीस अधिकारी गर्दीचे नियंत्रण करताना दिसत आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी चेंगराचेंगरी सुरू झाली त्यावेळी एसपी सुब्बारायडू स्वतः टोकन वितरण केंद्रांची व्यवस्था पाहत होते. जिल्हाधिकारी डॉ. एस. वेंकटेश्वर आणि संयुक्त जिल्हाधिकारी शुभम बन्सल यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि जखमींची माहिती घेतली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img