सध्या बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख(Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा विरोधक सातत्याने करताना दिसत आहे तर भाजपचे आमदार सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. मात्र या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्या विरोधात कोणाताही पुरावा नाही. तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही. असं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं म्हणणं आहे. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, ‘बीडमधलं संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे, तेथील संतोष देशमुख हत्येचा खटला हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवला. तसेच एसआयटीमधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली पाहिजे.’ अशी मागणी त्यांनी केली. तर ‘अजित पवार हे हतबल आहेत, ते नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना ( निवडणुकीत) जागा मिळाल्या आहेत, स्वत:च्या कर्तृत्वावर नव्हे. ते जर महाराष्ट्राचे नेत असते तर त्यांनी बीड प्रकरणातील त्या मंत्र्याला आपल्या मंत्रीमंडळातून वगळलं असतं, त्यांना आता आणखी कोणते पुरावे हवे आहेत.’ असं ही ते म्हणाले.
बीडमध्ये लोकांना फसवण्याचा खेळ चाललेला आहे.ज्या पद्धतीने आरोपी, पोलीस , राजकारणी यांचे जेवणाचे, बैठकीचे फोटो समोर येत आहेत. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणाचा आणि माफियागिरीच्या तपासाचा जो फार्स चालू आहे. तर, भाजप ज्या पद्धतीने आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल असा हल्ला राऊत यांनी चढवला. बीड पॅटर्न महाराष्ट्रात लागू झाला, तर प्रत्येक राज्यात हाच पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून हे राज्य निसटून जाईल. असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) त्यांनी दिलयं.