कार व दुचाकीच्या अपघात एक ठार, एक जण गंभीर जखमी
[ कल्याण अहिल्यानगर महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा ]
ओतूर,प्रतिनिधी:दि.७ जानेवारी ( रमेश तांबे )
कल्याण -अहिल्यानगर महामार्गावर कार आणि दुचाकीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.सदरचा अपघात उदापूर ता.जुन्नर गावच्या हद्दीत हॉटेल निमंत्रण समोर घडला.
प्रेमा भरत घोडेकर वय.२५ रा.ओतूर ता.जुन्नर जि.पूणे असे अपघातात ठार झालेल्या दूचाकीस्वाराचे नाव आहे.तर कार मधील यश चव्हाण वय.३५ रा.शिरोली ता.जुन्नर हा गंभीर जखमी झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर ओतूर कडून कल्याणच्या दिशेने जाणारी दुचाकी व कल्याण दिशेकडून ओतूरच्या दिशेने येणारी कार यांची उदापूर गावच्या हद्दीत हॉटेल निमंत्रण समोर रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील प्रेम घोडेकर हा तरूण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला आहे.तर कार मधील यश चव्हाण हा गंभीर जखमी झाला.या अपघातात कार व दुचाकी या दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, शामसुंदर जायभाये यांनी घटनास्थळी जाऊन महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहे.