निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Scheme) 1500 महिना याप्रमाणे पाच महिन्यांचे साडे सात हजार मिळाले. मग निवडणुकीनंतर यात आणखी वाढ करु, 2100 रुपये देऊ असे आश्वासन मिळाले. लाडक्या बहिणींनी या दिलदारपणावर विश्वास ठेवत भावांना भरभरून मतदान केलं. पण आजच्या घडीला 2100 रुपये लांबच राहिले. उलट महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी पुन्हा सुरु झाली आहे. यात निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. यानुसार लाभार्थ्यांना मिळालेले साडेसात हजार रुपये वसूल करण्यासाचीही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
परंतु निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले. योजनेसाठी तब्बल दोन कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी दोन कोटी 34 लाख महिलांना लाभ मिळाला होता. तसेच त्यावेळी आधार सिडींग झालेले नसल्याने काही महिला या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. ज्या महिलांचे आता आधार सिडिंग झाले आहे अशा आणखी 12 लाख 67 हजार महिलांना पहिल्या महिन्यापासूनचे पैसे एकाच वेळी देण्यात आले.
निवडणुकीदरम्यान, निकाल लागताच ही योजना बंद होईल अशा चर्चा झाल्या. तसेच निवडणूक झाल्यानंतर या योजनेचे निकष बदलले जातील, अर्जांची छाननी होईल, अशाही बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यावेळी महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून आम्ही कुठलेही निकष लावणार नाहीत, एखाद्या जिल्ह्यातील ठराविक तक्रार आली, तर फक्त त्याबद्दलच विचार केला जाईल, असे म्हटले होते. निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. आता ही योजना पुढे चालू राहणार आहे, पण आलेल्या अर्जांची पुन्हा छाननी होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
अर्जांवर अनेक तक्रारी आल्या आहेत. विशेषतः धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली, पालघर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात बोगस अर्ज, चुकीची माहिती, नाव आणि आधार नंबर वेगवेगळा असणं, दुहेरी अर्ज, चुकीचं हमीपत्र, तसेच परराज्यात गेलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जांबाबत तक्रारींचा समावेश आहे. तर काही पुरुषांनी महिलांच्या नावावर बोगस अर्ज भरल्याचे समोर आले आहे. असे अर्ज बाद झालेच आहेत. शिवाय सरकारी नोकरीत लागल्यामुळे, नोकरीत प्रमोशन झाल्यामुळे आमचा लाभ कमी करावा, अशी मागणी संबंधित महिलांनी स्वत:हून केली आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
याच छाननीत निकष डावलून अर्ज भरलेल्या महिलांकडून साडे सात हजार रुपये वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात नकाणे गावातील खैरनार नामक महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळून आले. अन्य एका योजनेतही या महिलेला आर्थिक लाभ मिळाला होता. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचे तिला सांगण्यात आले. त्यानुसार या महिलेचे साडेसात हजार रुपये चलन भरून परत घेण्यात आले आहेत. हे पैसे परत सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत, असे धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले. आता एकूण पाच निकष लावून संपूर्ण महाराष्ट्रातील अर्जांची छाननी होणार आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
Ladki Bahin Scheme हे निकष नेमके कोणते? पाहुया..
पहिला निकष आहे, अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार अर्जांची छाननी होईल. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला असतील, तर लाभ मिळणार नाही.
दुसरा निकष आहे, एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यांच्या अर्जांबद्दलही पुनर्विचार केला जाणार आहे. एखादा लाभार्थी ‘नमो शेतकरी’ योजनेचा फायदा घेत असेल, तर त्याला या योजनेतून 1000 रुपये आधीच मिळतात. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे 500 रुपये देऊन 15000 रुपयांपर्यंतचा फरक भरून काढला जाईल.
तिसरा निकष आहे, चारचाकी वाहनाचा. चारचाकी वाहन असलेल्या महिलांच्या अर्जांचीही पडताळणी होणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे.
चौथा निकषही महत्वाचा आहे. अशा अर्जांची सुद्धा पडताळणी ज्याची आधार कार्डवर नाव वेगळं आणि बँकेत नाव वेगळं केली जाणार आहे.