बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या घटेनचा सर्व स्तरावरुन निषेध केला जात आहे. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीच्या हाती मोठं यश मिळालं आहे. या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना पकडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार होते. आता या तिन्हीही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील एकाला मुंबईतून तर दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याचे बोललं जात आहे. आता पोलीस यांना कधी अटक करणार, त्यांना कोर्टात कधी हजर केले जाणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Santosh Deshmukh सुदर्शन घुले ताब्यात
गेल्या काही दिवसांपासून आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार होते. सीआयडीकडून त्यांचा कसून शोध सुरु होता. सीआयडीचे वेगवेगळे पथक मुंबई, पुणे यांसह ठिकठिकाणी शोध घेत होते. आता याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धार्थ सोनावणे यानेच सरपंच संतोष देशमुख यांची टीप दिली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. आता लवकरच बीड पोलीस अधिक्षक एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत पोलीस याबद्दलची सविस्तर माहिती देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.